निमगाव दुडे येथे गावठी हातभट्टीवर धाड ; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
टाकळी हाजी | शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथील घोडनदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून तब्बल १२ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईनंतर टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गुरुवारी (ता. १४) रात्री निमगाव दुडे हद्दीतील दुडेवाडी परिसरात, घोडनदी किनाऱ्यालगत झाडाझुडपांमध्ये गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती सुरू असल्याचे उघड झाले.
या अवैध धंद्यावर कारवाई करताना पोलिसांनी २४ हजार लिटर कच्चे रसायन, ७० लिटर तयार गावठी दारू, मोठ्या लोखंडी टाक्या, चुलीचे साहित्य व हातभट्टीसाठी लागणारे साहित्य असा एकूण १२ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेले रसायन मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांच्या नजरेतून कसा सुटला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. टाकळी हाजी येथे पोलीस दुरक्षेत्र अस्तित्वात असताना अवैध धंदे बिनधास्त सुरू राहतातच कसे, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घोडनदी परिसरात सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती का, की माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात आले, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
या प्रकरणी दोघांविरुद्ध फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
याचबरोबर टाकळी हाजी दुरक्षेत्र परिसरात केबल चोरी, पशुधन चोरी, विद्युत पंप चोरी, रोहित्र चोरी तसेच शेतमाल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांचा तपास करण्यात किंवा चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून समाधानकारक उपाययोजना होत नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. काही प्रकरणांमध्ये तपासाची दिशा बदलणे किंवा परस्पर विरोधी गुन्हे दाखल केल्याच्या चर्चांमुळेही पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.