टाकळी हाजी पोलीस चौकी वसुलीचा अड्डा?

व्हायरल व्हिडिओने नागरिकांचा संताप उसळला

0

टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकीवर गंभीर आरोपांचा भडका उडाला असून, ही चौकी थेट वसुलीचा अड्डा बनल्याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांतून सुरू आहे. परस्परविरोधी तक्रारी घेणे, पैशांच्या जोरावर तडजोडी घडवून आणणे आणि संशयास्पद व्यवहारांना खतपाणी घालणे, अवैध धंद्यांवर कारवाई न करणे अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नुकत्याच उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे या आरोपांना अधिक धार आली आहे. टाकळी हाजी येथील एक तरुणी बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी ती पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने विवाह केल्याचे स्पष्ट झाले; मात्र जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांनी तपासा सोबत मुलाच्या नातेवाईकांकडून पैशांची उकळपट्टी केल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

कायद्याचे रक्षकच भक्षक बनले का? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांकडून हप्ते उकळणे, चोरीच्या आरोपींना पाठीशी घालणे, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांशी संगनमत अशा गंभीर आरोपांची मालिका उघडपणे पुढे येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या पीडिताने तक्रार दिली तरी समोरील व्यक्ती पोलिसांशी सेटिंग करून विरोधी तक्रार नोंदवून घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी, न्याय मागणाऱ्यांनाच धक्के बसत असून सामान्य नागरिक असुरक्षिततेच्या छायेत जगत आहेत.

यापूर्वीही शेतकऱ्यांच्या कृषी साहित्य व पशुधन चोरीच्या प्रकरणांत पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे हे सगळं नक्की कोणाच्या आशीर्वादाने चाललं आहे? यात वरिष्ठ ही सामील आहेत का,असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.