शेतातील रोहीत्रांतील तांब्याच्या तारा चोरी करणारे जेरबंद
शिक्रापूर पोलिसांची दमदार कारवाई ; १६ गुन्हे उघड
शिरूर | (साहेबराव लोखंडे)
शेतातील महावितरणाच्या विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा शिकापूर (ता.शिरूर) पोलिसांनी पर्दाफाश करत सात जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १६ गुन्हे उघडकीस आले असून १२ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील तीन महिन्यांपासून परिसरात रोहीत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या चोरीमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या.
तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत सहा मुख्य आरोपी व चोरीचा माल खरेदी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या टोळीने शिकापूर, रांजणगाव एमआयडीसी आणि शिरूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे.आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक पोलो व एक क्विड कार, साहित्य आणि सुमारे ४१० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार शिवाजी चितारे, अमोल चव्हाण, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, रोहीदास पारखे, विकास पाटील, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांच्या पथकाने केली.