ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली २४ लाखांची फसवणूक

पराग साखर कारखान्याची तब्बल २४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक

0

शिरूर : (साहेबराव लोखंडे)

शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील पराग साखर कारखान्याची ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली तब्बल २४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात कार्यरत असलेले राहुल रामदास भाकरे यांनी फिर्याद दिली आहे. १४ जुलै २०२५ रोजी रावडेवाडी येथील पराग साखर कारखान्यास ऊसतोड मजूर पुरविण्याचे आश्वासन देत जळगाव जिल्ह्यातील घोडेगाव येथील तिघांनी लेखी करार केला होता. या कराराच्या आधारे संबंधितांनी कारखान्याकडून एकूण २४ लाख ३८ हजार रुपये आपल्या बँक खात्यावर घेतले.

यामध्ये गोरख भारमल राठोड याने ८ लाख १८ हजार रुपये, नितीन तुळशीराम चव्हाण याने ४ लाख ८६ हजार रुपये, तर ज्ञानेश्वर गबरू राठोड याने ११ लाख ३४ हजार रुपये अशी रक्कम स्वीकारली. मात्र, प्रत्यक्षात ऊसतोड मजूर पुरवठा न करता संगनमताने कारखान्याची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.