एकाच रात्री पाच शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबलची चोरी
पोलिसांनी गांभीर्याने तपास करण्याची शेतकऱ्यांची मागणी
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
घोडनदी परिसरातील विद्युत पंप व केबल चोरीच्या उपद्रवामुळे सध्या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड व मनःस्तापास सामोरे जावे लागत आहे.बुधवारी (दि. १२) रात्री निमगाव दुडे (ता.शिरुर) परिसरातील भाऊसाहेब चंदर दाते, प्रभाकर गेणभाऊ रावडे, शिवनाथ गेणू रावडे, दशरथ रामभाऊ शिंदे, सुमित भानुदास कांदळकर या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची एकाच रात्री चोरी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत कवठे येमाईचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घोडे,अविनाश पोकळे यांनी व्यक्त केले.
शिरुर तालुक्याच्या बेटातील टाकळी हाजी – कवठे येमाई परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा हंगाम अत्यंत खडतर ठरत असून या वर्षी कडक उन्हाची झळ लवकरच बसण्यास सुरुवात झाली आहे. अशाही परिस्थितीत मेहनतीने आणि धैर्याने शेतातील पिके जागविण्याचा प्रयत्न करत असताना आर्थिक संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना आता चोरांकडून कृषी विद्युत पंप व केबल चोरीचे प्रकार वाढल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.
बी बियाणे, खते, औषधे, डिझेल, पेट्रोलचे वाढलेले बाजारभाव त्याचबरोबर पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष , विजेचा सततचा लपंडाव, सातत्याने बदलणारे हवामान , बिबट्याची दहशत अशा सर्वच बाजुंचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत.आणि अशा परिस्थितीत भुरट्या चोरांचा शेती साहित्य चोरण्याचा उपद्रव सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
टाकळी हाजी, निमगाव दुडे, माळवाडी, म्हसे, कवठे येमाई, मलठण या परिसरात बिबट्यांच्या मोठा वावर असल्याने पशुधन वाचविण्या बरोबरच आपण जगायचे कसे ? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. बिबट्यांच्या दहशतीने शेतकरी सूर्यास्तानंतर घरीच थांबणे योग्य समजत आहेत.याचा फायदा घेत दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी चोर डल्ला मारत आहेत. पोलीस यंत्रणेने अशा सराईत चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी निमगाव दुडेचे माजी सरपंच दिपक दुडे , अमोल घोडे यांनी केली आहे.
अनेक शेतकरी अर्थिक अडचणीत आहेत. केबल आणि कृषी पंपाच्या चोऱ्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करता ही हानी भरून काढणे जिकिरीचे आहे. या चोरांचा तपास लागत नसल्याने सामान्य जनतेच्या मनात पोलिसांविषयी शंका उपस्थित होत आहे तर चोर पकडले जात नसलेने चोरांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे.