शिरुर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याच्या हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला…
शिक्रापुर |
शिरुर तालुक्यातील RTI कार्यकर्ते यांच्या घराची रेकी करत त्यांच्या गाडीचा पाठलाग करत हत्येचा कट रचल्या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे तीन जणांविरुद्ध अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असुन गुन्ह्यात वापरलेली बलेनो कार क्रं एम एच १२ एक्स ई ५१०९ शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी RTI कार्यकर्ते अशोक भोरडे हे कुटुंबियांसोबत बाहेरगावी जात असताना हि घटना घडली आहे. अशोक भोरडे यांनी निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे नियमबाह्य डोंगर उत्खनन चालु असल्याबाबत शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच तलाठी आबासाहेब रुके यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे दुःखावलेल्या काही जणांना चीड आल्याने भोरडे यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांची हत्या करण्याचा कट रचला.
अशोक भोरडे यांनी शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले तसेच बीट अंमलदार किशोर तेलंग यांना फोन केला. शिवाय ११२ वर संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यामुळे तातडीने पोलिस घटनास्थळी आले आणि पाठलाग करणारी कार ताब्यात घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत भोरडे यांच्या फिर्यादीवरुन अमोल सतिश वडघुले, मयुर शामराव वडघुले, राहुल शंकर करपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक भोरडे यांच्या जिवीताला धोका…?
या घटनेमुळे RTI कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला असुन त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोरडे यांनी यापुर्वीही अनेकवेळा गौणखनिज उत्खनन, वाहतुक आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी केलेल्या असुन त्यांची चौकश्या चालु आहेत. तसेच त्यांनी वेळोवेळी उपोषण, आंदोलन करुन अनेक पिडीत व्यक्तींना न्याय मिळवुन देण्यासाठी ते सतत संघर्ष करत आहेत. त्यामुळे अनेकजण त्यांच्यावर चिडून आहेत. त्यामुळे त्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला असुन शासनाने त्यांच्या जिवीताची काळजी घ्यावी अशी मागणी तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनेने केली आहे.