सरपंच दत्तात्रय जोरी यांच्याविरोधात अविश्वास ठरावाची मागणी
जांबुत ग्रामपंचायत मध्ये खळबळ ; आठ सदस्यांचा तहसीलदारांकडे अर्ज
पिंपरखेड | प्रफुल बोंबे
शिरूर तालुक्यातील महत्त्वाच्या जांबुत ग्रामपंचायतीत राजकीय हालचालींना वेग आला असून विद्यमान सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अधिकृत अर्ज सादर केल्याने गावातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२२ मध्ये पार पडली होती. त्यानंतर ३० ऑगस्ट २०२२ पासून दत्तात्रय जोरी हे सरपंचपदी कार्यरत आहेत. मात्र, अलीकडील काळात त्यांच्या कार्यपद्धतीबाबत काही सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सदस्यांनी सादर केलेल्या अर्जात सरपंच जोरी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. सदस्यांवर विश्वास न ठेवणे, मनमानी पद्धतीने कारभार करणे तसेच गावाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासन सुरळीत व पारदर्शकपणे चालण्यासाठी अविश्वास ठराव आवश्यक असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ अंतर्गत विशेष सभा बोलावून अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिरूर तहसीलदारांनी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील कारवाई करावी, अशी विनंती अर्जदार सदस्यांनी केली आहे.
या अर्जावर गोरक्ष गजानन गाजरे, सुप्रिया ज्ञानेश्वर जगताप, दिपाली दिलीप दुडे, राणी उमेश बोऱ्हाडे, राहुल रावसाहेब जगताप, सुभाष रामचंद्र जगताप, पोपटलाल नेनसुख फिरोदिया आणि रेखा तुळशीराम खुपटे या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पुढील घडामोडी काय घडतात, याकडे जांबुत ग्रामस्थांचे लक्ष लागले असून ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.