टाकळी हाजी |
शिरूर तालुक्यातील चांडोह येथे मंगळवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या ५० वर्षीय संगिता अंकुश शिंदे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संगिता शिंदे या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मागून गळा आणि मानेवर जबरदस्त हल्ला केला. जोरात आरडाओरड केल्यामुळे शेजारील नागरिक तत्काळ धावत आले, त्यामुळे बिबट्याने पळ काढला. मात्र त्यांच्या गळा आणि मानेवर खोलवर जखमा झाल्याने तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे हलवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लहू केसकर व वनकर्मचारी महेंद्र दाते यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. वनविभागाकडून परिसरात तत्काळ दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.
या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांनी बिबट्याच्या मुक्त संचारावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी शिंदे यांची भेट घेत त्यांना धीर दिला.
गेल्या दोन वर्षांत शिरूर तालुक्यातील बेट भागात – जांबूत, पिंपरखेड, काठापूर खुर्द, चांडोह या गावांमध्ये पावसाळ्याच्या काळात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेकांवर हल्ले झाले असून पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाने या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने पाहून तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.