रावडेवाडी येथे मेंढपाळावर कोयत्याने हल्ला
टाकळी हाजी |
रावडेवाडी (ता.शिरूर) येथे एका मेंढपाळावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१८) रात्री घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अमोल उर्फ युवराज लक्ष्मण तांबे (रा. रावडेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ रघुनाथ रूपनेर (वय ३५, रा. कान्हुर मेसाई) हे आपल्या कुटुंबासह रावडेवाडी येथील प्रदीप तांबे यांच्या शेतात पत्नी व मुलांसह वाघूरीजवळ झोपलेले असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अमोल लक्षण तांबे याने वाघूरीतील एक कोकरू उचलून नेले. कोकरू देण्यास नकार दिल्यानंतर झालेल्या वादात आरोपीने संतापून रूपनेर यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात रूपनेर यांच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ, पोटरीवर, तळहातावर गंभीर जखमा झाल्या असून, कपाळालाही दुखापत झाली आहे. घटनेदरम्यान हस्तक्षेप करणाऱ्या त्यांच्या पत्नीला देखील आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस नाईक अनिल आगलावे पुढील तपास करत आहेत.