पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात घबराट

0

 

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा

पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवार (दि.१) रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पुजा जालिंदर जाधव या २२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून सुनिल कुऱ्हाडे यांच्या उसाचे शेतात ओढत नेऊन तिच्या शरीराचा गळ्याभोवतीचा काही भाग खाल्ल्याने सदर महिला मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सदर महिला ही पुणे जिल्ह्यातील टाकेवाडी , कळंब (ता. आंबेगाव) येथील रहिवासी असून तिचे पती जालिंदर मारुती जाधव (वय २६ वर्षे) व दिर विश्वास बाळू जाधव (वय ३८ वर्षे) असे तिघे मोटरसायकलवर फाकटे ते कळंब गावी जात असताना बोंबे मळा परिसरात लघुशंके करिता थांबले असता सदर महिलेच्या पती व दिराच्या समक्ष सदर महिलेवर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी शोध घेतला असता उसाचे शेतात पुजाचा मृतदेह मिळून आला.

शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले असून मनुष्यावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे या भागातील लोक जीव मुठीत धरून जीवन व्यतीत करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी महेंद्र दाते आणि पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे  यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी संपर्क साधला असता शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने महिलेचा शोध घेवून सदर मयत महिलेस शवविच्छेदनासाठी शिरूर येथे नेण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे समजले.

 

बेट भागात मानवी हल्ले झाल्याच्या अनेक घटना घडूनही वनविभागास जाग येत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वनविभागास नक्की जाग कधी येणार ,असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे. यापुढे बिबट्या कडून होणारे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर वनविभागाच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.