बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी सहजीवनाचा मार्ग स्वीकारणे गरजेचे ….. स्मिता राजहंस
पिंपरखेड येथे मानव–वन्यप्राणी संघर्ष कार्यशाळा; सुवर्णपदकाबद्दल सत्कार
जांबूत |( प्रफुल्ल बोंबे )
“बिबट-मानव संघर्ष हा आपल्या परिसरातील गंभीर प्रश्न असून नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता जपत वनविभागासोबत संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे. आपला सजग निर्णयच अनेकदा जीव वाचवू शकतो. बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी आपण एक पाऊल सहजीवनाकडे टाकणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन जुन्नर वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी केले.
पिंपरखेड (ता. शिरूर) येथे आयोजित मानव–वन्यप्राणी संघर्ष कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी वनविभागातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णपदकाने गौरव झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
नोव्हेंबर २०२५ मध्ये पिंपरखेड व जांबूत परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलने उभारली होती. या आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेतल्यानंतर वनविभागाच्या कारवाईला गती मिळाली. वाईल्ड लाईफ पथक, शार्प शुटर टीम, पिंजरे व इतर साधनसामग्री उपलब्ध झाल्याने आतापर्यंत तब्बल ४७ बिबट जेरबंद करण्यात यश आल्याचे राजहंस यांनी सांगितले.
“जुन्नर वनविभागाच्या इतिहासातील भूतो न भविष्यती असे शुटआऊट ऑपरेशन पिंपरखेड येथून घडले. हे यश केवळ प्रशासनाचे नसून ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले,” असेही त्या म्हणाल्या. मात्र परिसरात अजूनही बिबट्यांची संख्या मोठी असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिल सहारे, सौमित्र तिजारे व राकेश निमसरकार यांच्या माध्यमातून विविध कलाकारांनी बिबट प्रतिबंधक उपाययोजनांची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते, बेस कॅम्प टीमचे कर्मचारी, शिरूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बोंबे, रामदास बराटे, जयवंत बोंबे, देवराम ढोमे, शिवाजी वरे, बाळासाहेब बोंबे, गणेश बोंबे, आबाजी पोखरकर, सचिन बोंबे, नरेंद्र बोंबे, रवींद्र बोंबे, विलास बोंबे, शिक्षिका प्रियांका दाभाडे, प्रियांका येवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.