केबल चोरीमुळे शेतकरी हैराण…
टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील बेट भागात कृषी पंप आणि केबल ची चोरी करणारांना कायद्याचा धाक किंवा शेतकऱ्यांचे हित याविषयी कसलेही सोयरसुतक नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.
घोडनदी वरून अनेक शेतकऱ्यांनी पाईप लाईन केलेल्या आहेत. पाऊस चालू असल्यामुळे या काळात नदीवरील मोटारी चालू करण्याची गरज भासली नाही ,तरीही शेतकऱ्यांना मोटार आणि केबल साठी वारंवार तिकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत.
टाकळी हाजी येथील घोडनदी वरील निमगाव दुडे बंधारा येथील शहाजी गावडे,दादाभाऊ गावडे या शेतकऱ्यांच्या केबल ची चोरी झाली असून यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चोरट्यांनी या केबल तिथेच झाडांच्या अडचणीत आवरण सोलून आतील तारा काढून घेतलेल्या दिसून आल्या आहेत. या केबल तर परत मिळणार नाहीत परंतु नवीन केबल खरेदी कराव्या लागणार आणि त्या पण सुरक्षित राहतील याबद्दल शंका उपस्थित झाली आहे.
मोटार आणि केबल चोरीला कायमच सामोरे जावे लागत असल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. यापुढे रात्रीच्या वेळी केबल ची राखण करण्याची वेळ आली असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. रात्रीची वीज असल्यास शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी बिबट्याच्या भीतीने जीव मुठीत धरून काम करावे लागते,आणि आता यामध्ये चोरांची आणखी भर पडली तर शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कित्येक वेळा पोलिसांत तक्रार करूनही चोर सापडले नाहीत आणि केबल परत मिळालेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना नवीन केबल खरेदी करावीच लागते. त्यामुळे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे ग्रामपंचायत सदस्य बाबाजी साबळे यांनी सांगितले.