सविंदणेत बिबट्याचा थेट वस्तीमध्ये शिरून कुत्र्यावर हल्ला

0

सविंदणे | सविंदणे (ता. शिरूर) येथील पूर्व नरवडे मळा परिसरात शनिवारी (दि. ३१) पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्याने थेट वस्तीमध्ये शिरून पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

संभाजी नरवडे यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या अंगणात बिबट्याने लोखंडी तारेच्या संरक्षक कंपाउंडवरून उडी मारत प्रवेश केला. त्यानंतर घरासमोर असलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला जबड्यात पकडत पुन्हा कंपाउंड ओलांडून बाहेरच्या दिशेने नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागात यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र आता थेट वस्तीमध्ये झालेल्या या घटनेमुळे लहान मुले, महिला व वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घ्यावी, परिसरात गस्त वाढवावी तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.