रांजणगाव एमआयडीसी परिसरात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

203 किलो 600 ग्रॅम गांजा मिश्रित ‘बंटा’ गोळ्या हस्तगत; 20 वर्षीय तरुण अटकेत

0

शिरूर | रांजणगाव एमआयडीसी परिसरात गांजा मिश्रित गुंगीकारक ‘बंटा’ नावाच्या अमली गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 203 किलो 600 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, एकूण 57 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

दि. 10 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना, येथील सरकारी दवाखान्याजवळ राहणारा विपुल संदीप विटकर (वय 20, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा त्याच्या राहत्या घरात तसेच घरालगतच्या पानटपरीमध्ये गांजा मिश्रित ‘बंटा’ गोळ्या बेकायदेशीररीत्या साठवून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार तुषार अशोक पंदारे यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग यांचे आदेश प्राप्त करण्यात आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने छापा टाकून कारवाई केली. छाप्यात आरोपीकडून 203 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा मिश्रित अमली पदार्थ जप्त करण्यात आला.या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीन, राहुल पवार आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, विजय सरजिने, विलास आंबेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.