शिरूर | ( साहेबराव लोखंडे )
शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरीसारख्या गुन्ह्यांचा गुंता सोडवत विविध १८ गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेले साडेसोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपयांची रोख रक्कम, असा एकूण १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून संबंधितांना परत केला.
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे सूक्ष्म विश्लेषण, तांत्रिक तपास आणि माहिती संकलन यांच्या आधारे सराईत आरोपींचा शोध घेत महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले. या आधारे पोलिसांनी अनेक दिवस मेहनत घेऊन गुन्ह्यांतील विविध मालमत्ता जप्त केली.
जप्त केलेला मुद्देमाल २७ नोव्हेंबर २०२५ ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या १८ गुन्ह्यांच्या फिर्यादींना परत देण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू मांगडे आणि महिला पोलीस अंमलदार अर्चना यादव यांच्या पथकाने केली.
शिरूर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून गुन्हेगारीवर पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावीपणे नियंत्रण मिळवल्याचे मत व्यक्त केले जात आहे.