सत्तावीस वर्षांची प्रतीक्षा संपली; रसाळवाडी-माळवाडी जोडणारा रस्ता अखेर तयार
माळवाडी ग्रामपंचायतीच्या तरुण कार्यकारिणीच्या पुढाकारास यश
टाकळी हाजी |
पुणे – अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा रसाळवाडी – माळवाडी रस्ता माळवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने अखेर खुला झाल्याने सत्तावीस वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
सन १९९८ साली तत्कालीन जलसंधारण मंत्री यांच्या हस्ते कुकडी नदीवरील पुलाचे उद्घाटन झाले होते. मात्र रसाळवाडीच्या बाजूने रस्ता तयार झाला असला, तरी माळवाडीच्या बाजूस शेतजमिनीमुळे रस्ता होऊ शकला नाही. परिणामी, पुलाचा वापर तब्बल सत्तावीस वर्षे केवळ पाऊलवाट म्हणून होत होता. अखेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने बारा फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला असून, या मार्गाचा दीर्घकाळचा प्रश्न मार्गी लागला आहे.
हा रस्ता पुणे जिल्ह्यातील माळवाडी व नगर जिल्ह्यातील रसाळवाडी (निघोज) यांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळण दुवा आहे. कुकडी नदी ही दोन्ही जिल्ह्यांची सरहद्द असून या परिसरातील काही भूभाग दोन्ही बाजूंनी नगर जिल्ह्यात मोडतो. अनेक वर्षांपासून स्थानिक नेते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला; मात्र प्रशासकीय व स्थानिक अडथळ्यांमुळे कोणताही तोडगा निघत नव्हता.
नुकत्याच स्थापन झालेल्या माळवाडी ग्रामपंचायतीच्या तरुण कार्यकारिणीने या प्रश्नावर ठोस पावले उचलली. सरपंच सोमनाथ भाकरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांशी
उपसरपंच साधना गारुडकर, माजी उपसरपंच आनंदा भाकरे, आदिनाथ भाकरे,ग्रामपंचायत सदस्य पूजा पांढरकर, निलम रसाळ, तंटामुक्ती अध्यक्ष विलास भाकरे, निघोजचे ग्रामपंचायत सदस्य योगेश वाव्हळ,रघुनाथ वाव्हळ,निवृत्ती रसाळ,माऊली रसाळ, सुरेश रसाळ, अविनाश कोल्हे, जयवंत वाव्हळ, भुजंग भाकरे, रामदास रासकर, नंदु खेडकर, संतोष भाकरे, शंकर भाकरे, रावसाहेब गारुडकर, भरत गारुडकर, सुरेश फुलसुंदर, भागचंद्र फुलसुंदर, चंद्रकांत ढवण, संतोष भाकरे यांनी समुपचाराने संवाद साधला. जनहितासाठी तेथील शेतकरी पुढे आले आणि आपली जमीन विनामोबदला उपलब्ध करून दिली.
समाधान गोरक्ष भूकन, शिवाजी लक्ष्मण भूकन, नाथा लक्ष्मण कोल्हे, नारायण भिकाजी कोल्हे, अर्जुन लक्ष्मण भाकरे व बाळासाहेब भिकाजी कोल्हे या शेतकऱ्यांच्या योगदानामुळे हा रस्ता अखेर साकार झाला.
या रस्त्यामुळे माळवाडी आणि रसाळवाडीतील दळणवळण सुलभ होणार असून, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांचे व शेतकऱ्यांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रस्त्याचा विकास हा दोन्ही गावांसाठी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीचा नवा मार्ग खुला करणारा ठरणार आहे.