फाकटे फाटा-टेमकरवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण
रस्त्यावर टाकलेले डांबर आणि खडी उखडली
टाकळी हाजी |
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील फाकटे फाटा ते टेमकरवाडी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, गटार व संरक्षक भिंतीचे काम गेली दोन वर्षे रखडलेले व अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांनी आता उघडपणे संताप व्यक्त केला आहे. टाकळी हाजी गावच्या दोन्ही बाजूने पुढे जाणारा हा मुख्य रस्ता असून सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे स्वरूप मोठे असले तरी, प्रत्यक्षात कामाची गती आणि परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
या कामात माती भराव, खडीकरण, मुरूम बाजूपट्टी, कच्चे व काँक्रिट गटर्स, नवीन पाईप, मोऱ्या आणि संरक्षक भिंती अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र या सर्वांपैकी अनेक घटक अपूर्ण आहेत किंवा केलेल्या कामाची गुणवत्ता अत्यंत ढिसाळ आहे.
रस्त्याच्या मधोमध दुभाजक उभारणीसाठी आणलेले सिमेंटचे ब्लॉक्स फक्त टाकून दिले असून ते कोणत्याही नियोजनाशिवाय रस्त्याच्या मध्ये पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून, काही दिवसांपूर्वी एका चारचाकीने घसरून थेट दुकानात धडक दिली. दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या अनेक घटनाही घडल्या असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
या रस्त्यावर टाकलेले डांबर आणि खडी उखडून पडली आहे. त्यामुळे रस्त्यावर सतत धुरळा उडत आहे. शेजारील घरे, दुकाने आणि नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुलांचे आरोग्य, वृद्धांची तब्येत आणि व्यापाऱ्यांच्या रोजच्या कामकाजावर याचा विपरीत परिणाम होत आहे.
पावसाळा सुरू होण्याआधीच रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. उखडलेली खडी आणि अस्वच्छ मुरूम यामुळे येत्या काही दिवसांत पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या संपूर्ण कामाची अंदाजपत्रक व प्लॅन एस्टिमेटनुसार निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली आहे. ठेकेदाराचे काम अपूर्ण असतानाही याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी वा पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.