प्रमाणित नसलेले काटे ठरताहेत ग्राहकांच्या खिशावर गदा
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
शिरूर तालुका हा शेती आणि औद्योगिक प्रगतीमुळे वेगाने विकसित होत असला, तरी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची फसवणूक थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी बाजारात वापरण्यात येणारे काटे प्रमाणित नसल्याचे वास्तव उघड झाले असून, त्यामुळे ग्राहकांची सर्रास फसवणूक होत आहे.
वजन आणि मापे विभागामार्फत दरवर्षी काट्यांची तपासणी करणे बंधनकारक असताना अनेक दुकानदार या प्रक्रियेला बगल देतात. यामुळे अनेक ठिकाणी अशा काट्यांचा गैरवापर होत असून, वजन कमी दाखवून ग्राहकांकडून अधिक पैसे उकळले जात आहेत.
भाजी विक्रेते, दूध डेअरी, किराणा दुकाने, बांधकाम साहित्य विक्रेते आदी ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या काट्यांवर प्रमाणित शिक्के नसल्याचे निरीक्षणात आले आहे. काही ठिकाणी जुन्या काट्यांमध्ये तांत्रिक छेडछाड करण्याचे प्रकारही घडलेले आहे.
ग्राहकांनी तक्रार केली नाही तर कारवाई करता येत नाही, अशी भूमिका वजन व मापे विभागाने घेतल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. यंत्रणा कारवाई करत नसल्याने व्यवसायिकांना मोकळे रान मिळाले असून, ग्राहकांची गळचेपी सुरूच आहे.
खरेदी करताना काट्यावर प्रमाणित शिक्का आहे की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. तसेच फसवणूक झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत यंत्रणा उपलब्ध आहेत, याचा वापर करावा, असे आवाहन ग्राहक हक्क संघटनांकडून करण्यात येत आहे.