टाकळीकरांची प्रत्येक कुटुंबाची भक्तीची भाकरी
ओतूर येथील संत तुकोबाराय अमृतमहोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त टाकळी हाजी गावातून ३५०० भाकरी
टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे)
संत तुकोबाराय अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सांगता सोहळ्यानिमित्त ओतूर (ता. जुन्नर) येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा सध्या मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडत आहे. या पावन सोहळ्यासाठी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावकऱ्यांनी आपुलकी आणि सेवाभावाने एकत्र येत एक विशेष उपक्रम राबविला.
गावातील अनेक कुटुंबांनी एकत्र येत प्रत्येक कुटुंबातून ११ भाकरी तयार करून, मंगळवारी (दि.२० ) ३५०० भाकरी ओतूर येथे पाठवण्यात आल्या.
या उपक्रमामध्ये टाकळी हाजी गावठाण, शिनगरवाडी, टेमकरवाडी, उचाळेवस्ती, होनेवाडी, साबळेवाडी, शिंदेवस्ती येथील कुटुंबांनी उत्साहाने भाग घेतला. सर्व भाकऱ्या एकत्र करून टाकळी हाजी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जमा करण्यात आल्या व तेथून त्या ओतूरकडे रवाना करण्यात आल्या.
यावेळी ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे सदस्य, भाविक भक्त, माजी सरपंच आणि सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, दिंडी मंडळाचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष नारायण कांदळकर, भजनी मंडळाचे अध्यक्ष सोनभाऊ कांदळकर, भाऊसाहेब घोडे, सुभाष भोसले, अशोक मेचे, हरी मेचे, रमेश साबळे, कारभारी शितोळे, अंकुश शितोळे, सोसायटीचे संचालक रामदास सोदक, सखाराम खोमणे ,अनिल भंडारी, भाऊसाहेब चोरे,समाबाई कांदळकर यांच्यासह अनेक मान्यवर व गावकरी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांना सढळ हाताने सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि या आवाहनाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दिंडी मंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष महाराज गावडे आणि शिवाजी महाराज कांदळकर यांनी सांगितले की, “गावकऱ्यांनी आपापल्या परीने योगदान दिले असून, हे कार्य संत तुकोबारायांच्या भक्तीभावातून केले गेले आहे.”
या सेवाभावी उपक्रमातून सामुदायिक एकात्मता, धार्मिक श्रद्धा आणि सेवेचा भाव यांचे दर्शन झाले असून, टाकळी हाजी गावाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत भक्तीमध्ये आपला ठसा उमटविला आहे.