मळगंगा देवीच्या तीन दिवसीय मुख्य यात्रेस उत्साही प्रारंभ
टाकळी हाजी येथे पालखी व मानाची काठी मिरवणुकीसाठी भक्तजनांची मोठी गर्दी
टाकळी हाजी | साहेबराव लोखंडे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात भक्तिभावात पारंपरिक मळगंगा देवीच्या मुख्य यात्रेची सुरुवात झाली आहे. सोमवार दिनांक 21 एप्रिलपासून बुधवार 23 एप्रिलपर्यंत हा तीन दिवसीय यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.
पहिल्या दिवशी, सोमवारी रात्री देवीची काठी आणि पालखीची भव्य मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तांच्या घोषणांनी गगनभेदी वातावरणात काढण्यात आली. छबिना मोठ्या उत्साहात पार पडला.
पालखी व मानाची काठी मिरवणुकीसाठी गावात भक्तजनांची मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी सकाळी पालखी व मानाची काठी तीर्थक्षेत्र कुंड येथे नेण्यात येईल. तसेच बैलगाडा शर्यत आणि सायंकाळी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे.
मळगंगा देवीच्या यात्रेला केवळ स्थानिकच नव्हे, तर पुणे – नगर जिल्ह्यातील अनेक गावांमधून भक्त लाखोंच्या संख्येने हजेरी लावत आहेत.