प्रा. डॉ. पांडुरंग बरकले यांना आयस्टारचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
ISTAR चे संस्थापक अध्यक्ष डॉ. रोमेल टेबुला यांच्या हस्ते त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
पिंपरखेड| प्रतिनिधी
चांडोह (ता. शिरूर) गावचे सुपुत्र आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पांडुरंग बरकले यांना इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टीचर्स ॲडमिनिस्ट्रेटर्स ॲन्ड रिसर्चर्स (ISTAR) तर्फे ‘आउटस्टँडिंग अकॅडमिक लीडर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. बरकले २००७ पासून इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून, २०२२ पासून राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच, राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाचे नोडल अधिकारी म्हणूनही ते अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.
चांडोह सारख्या ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या डॉ. बरकले यांनी श्री दत्त विद्यालय, पिंपरखेड येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून, पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून स्नातक व स्नातकोत्तर पदव्या मिळवल्या. मुंबई विद्यापीठातून २०१८ मध्ये त्यांनी इंग्रजी साहित्य विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थिनी पीएच.डी. करत आहेत.
शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या डॉ. बरकले यांनी गेल्या १७ वर्षांत ३० शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले असून, ३१ वेळा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ व्याख्याता म्हणून निमंत्रित झाले आहेत. त्यांनी ४१ राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन लेख सादर केले असून, ३७ हून अधिक लेख आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. याशिवाय, त्यांनी १०० पेक्षा अधिक चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला आहे.
तीन विद्यापीठांच्या अभ्यासक्रम समित्यांचे तसेच दहाहून अधिक स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासमंडळांचे ते सदस्य आहेत. त्यांनी विश्वमराठी साहित्य कोशातही योगदान दिले आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशिवाय मुंबई विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्याशीही त्यांचा शैक्षणिक संबंध आहे.
नुकत्याच थायलंड येथील हुआचेव चर्लमप्रकीत विद्यापीठात ISTAR आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी ‘आभासी युगातील आंतरराष्ट्रीय शिक्षणासमोरील आव्हाने व उपाय’ या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. यावेळी ISTAR चे संस्थापक अध्यक्ष डॉ. रोमेल टेबुला यांच्या हस्ते त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या नामांकनासाठी RUSA चे सहसंचालक दत्तात्रय लोंढे यांनी शिफारस केली होती.
डॉ. बरकले यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे चांडोह व पिंपरखेड गावासह सर्व मित्र परिवारात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.