मुजोर मंडल अधिकाऱ्याची प्रशासन दखल घेणार का?
अख्य बेटच पोटात हडप करण्याची ..टाकळीच्या मंडल अधिकाऱ्याची असुरी हाव !
टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे
काम कोणतेही असो, खिसा गरम झाल्याशिवाय करणारच नाही असा जणू चंग बांधूनच जबाबदारी स्विकारलेल्या टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांची कामे गतिमान आणि पारदर्शी व्हावी यासाठी सरकारने शक्य तितकी कामे ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या अधिकारात असलेल्या काही ठराविक कामांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांची पायरी चढावीच लागते. यासाठी प्रत्येक कार्यालयात अधिकारी उपलब्ध आहेत. टाकळी हाजी येथील मंडल अधिकारी हे मात्र याला काहीसा अपवाद ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
टाकळी हाजी, निमगाव दुडे, म्हसे, माळवाडी, वडनेर, फाकटे, चांडोह, जांबुत, काठापूर ,पिंपरखेड या शिरूर तालुक्यातील संपूर्ण बेटासाठी टाकळी हाजी येथे मंडल कार्यालय आहे. मात्र या पोटकुलेंची भूक इतकी मोठी आहे की संपूर्ण बेटच पोटात घेण्याची असुरी हाव या राजाला उत्पन्न झाली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकरी येथे आल्यावर या कार्यालयाचा नामफलक पुसट झाल्याने नक्की कार्यालय कोणते हेसुध्दा लक्षात येत नाही. या मंडल कार्यालयात कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नोंदी, उताऱ्यावरील बोजा कमी करणे – चढविणे , संजय गांधी निराधार योजना, स्थळ पाहणी पंचनामा आदी कामांसाठी शेतकरी जेव्हा येथे जातात तेव्हा राजेशाही थाटात बसलेले राजेंद्र ” त्या व्यक्तीचा अंदाज घेतात आणि मग त्यांच्या अलिखित नियमानुसार ठरलेल्या शेजारच्या खोलीचा आणि मध्यस्थीचा आधार घेतात, त्यानंतर तिथे पोट खुले करून खिसा गरम झाला की मग काम होते,असा किस्सा येथील अनेक शेतकऱ्यांनी कालच्या प्रसिध्द झालेल्या वृत्तानंतर कथित केला.
शासनाने निराधार , विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे , मात्र या योजने पासून अनेक गरजू लाभार्थी वंचित आहेत. विविध कारणे देवून त्यांना टाळण्याचा प्रयत्न या महोदयांनी केला आहे. विविध कामांसाठी आर्थिक तडजोड करताना काही शेतकऱ्यांकडे रोख रक्कम नसल्याने या महाशयांनी चक्क स्वतःच्या फोन पे ला पैसे मारून घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
टाकळी हाजी मंडल अधिकारी यांच्या कामाविषयी वृत्त प्रसारित होताच ‘सत्यशोध’ प्रतिनिधीशी संपर्क साधत अनेक नागरिकांनी फोनद्वारे व समक्ष भेटून त्यांना आलेल्या समस्यांचा पाढा वाचला आहे. हा अधिकारी नक्की कोणाच्या आशीर्वादाने मलिदा गोळा करतोय ,की त्यास कुणाचा वरदहस्त आहे म्हणून मुजोर गिरी सुरू आहे याबाबत वरिष्ठांनी पडताळणी करावी अशी मागणी जोर धरत आहे. या भ्रष्ट आणि ढिसाळ अधिकाऱ्यावर वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.