टाकळी हाजीच्या मंडल अधिकाऱ्याची असुरी हाव … नागरिकांची वरिष्ठांकडे धाव
टाकळी हाजी – साहेबराव लोखंडे
शिरुर तालुक्याच्या सार्वजनिक , भौगोलिक इतिहासात बहुजनांची पंढरी अशी ओळख असलेल्या बेट भागात महसूली बाबुने नागरिकांना पैशाच्या हव्यासापोटी अक्षरशः हैराण करुन सोडले आहे. टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील मंडल अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत शिवाय त्यांच्याकडील सर्वर लक्ष्मी दर्शनाशिवाय सुरू होत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
टाकळीहाजी येथील मंडलअधिकारी सुलतानी बाण्याने वागत असून सामान्य शेतकऱ्यांना दोन्ही हाताने ओरबडून खात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यापूर्वीच्या इतिहासात कधीच येवढा भ्रष्ट अधिकारी या भागाने पाहिला नाही अशीच लोकांची भावना झाली आहे. तुम्ही कुणीही असो पैसे द्या तरच तुमचे काम होईल अन्यथा फुटा याच तोऱ्यात हे मंडलअधिकारी वावरत असून ते कार्यालयात नसताना त्यांना कधीही फोन केला तर ते फोन उचलणार नाहीत अन उचललाच तर वेगवेगळी कारणे देणार अशा गोष्टींचा येथील शेतकऱ्यांना वीट आला आहे. .साहेब आमच्या नोंदीचा विषय आहे..तेवढं बघा राव… अशी काकुळतीला येऊन विनंती करणाऱ्या बळीराजाला हे महाशय …अमचे सर्वर डाऊन आहे , असेच उत्तर बहुदा देताना ऐकावयास मिळत आहे.
गंमत अशी आहे मंडल अधिकाऱ्यांना जे कार्यालय आहे त्याला दोन खोल्या आहेत..एका खोलीत सगळ्यांना प्रवेश आहे…पण दुसऱ्या खोलीत फक्त देण्याघेण्याचा विषय असेल तरच प्रवेश मिळतो…एकदा का तोडपाणी झाले की त्याच क्षणी काम मार्गी…सरकारी हुद्देदार पैसे खातात हे नागरिकांनी गृहीत धरलेले असतेच…एक वेळेला बांधावरच्या म्हसोबाला शेतकरी नारळ फोडणार नाही पण महसुल कार्यालयात जाताना खिशात हजार- पाचशे टाकल्याशिवाय तो पायरी चढणार नाही हे अंतिम सत्य आहे. मात्र हजार- पाचशेचा नैवद्य या मंडलअधिकाऱ्याला आपल्या इभ्रतीचा अपमान वाटतो..कोणतेही काम असो पोट खुले आहे तोपर्यंत हे महाशय शेतकऱ्यांना साधे भेटत सुध्दा नाहीत हेच दुर्दैव आहे.
एकाच कामासाठी या कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या, शिवाय यांच्या वरिष्ठांकडे जावून दाद मागितली . मात्र वरिष्ठांनी सूचना देवूनही हे महाशय त्यांचा आदेश झुगारून देत आहेत. त्यांना संपर्क साधला तर मला एवढेच काम आहे का ? असे उद्धट उत्तर यांच्याकडून मिळाले. त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया येथील एका दिव्यांग महिलेनी दिली.
या कार्यालयात पूर्वीच्याच अधिकाऱ्यांचे नाव आणि मोबाईल नंबर लिहिलेला फलक लावला आहे , तेही बदलले गेले नाही. कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकावरील अक्षरे पुसून गेली आहेत. परंतु या महाशयांना तिकडे पाहण्यास वेळ नाही. तडजोड असेल तर मात्र उशिरा पर्यंत यांची गाडी तिथे उभी राहते हे विशेष.... सुनील थोरात , शेतकरी
आमचे सरकार पारदर्शक आहे असे पदाधिकारी ओरडुन सांगतात मग हा मंडलअधिकारीच भस्म्या रोग झाल्यासारखा बळीराजाचे का म्हणून शोषण करतोय.तुम्ही कधीही कार्यालयात जा एक तर कार्यालयाला टाळे किंवा दलाल मंडळींचा राबता हेच चिञ आहे…या बाबाला ना कलेक्टरची भिती ना तहसिलदाराची. दोन्ही हाताने ओरबडून लुट करणाऱ्या या मंडलअधिकाऱ्याची वाटमारी कधी रोखली जाईल का ? की यांच्या वाटमारीला वरिष्ठांची फुस आहे हेच कळायला मार्ग नाही अशी भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.