जिल्हा परिषद शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी माफ

टाकळी हाजी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय ; दर्जेदार शिक्षणासाठी प्रोत्साहन

0

टाकळी हाजी |  शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ग्रामपंचायतीने शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी अभिनव निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना चालू वर्षाची घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांकडे वळावे आणि शासकीय शिक्षण व्यवस्थेवर विश्वास वाढावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सरपंच अरुणा घोडे यांनी सांगितले.

ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र खराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लाभ टाकळी हाजी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व खातेदारांना लागू राहणार आहे. घरपट्टी माफीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत पहिलीत प्रवेश घेतल्याचा अधिकृत दाखला, संबंधित घराचा चालू वर्षाचा कर आकारणी उतारा (८ अ) तसेच पालक किंवा खातेदाराचे आधारकार्ड सादर करणे आवश्यक राहणार आहे.

या उपक्रमामुळे शिक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून पालकांना आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

आपली मुले, आपले भविष्य, या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असून ग्रामीण शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच हा निर्णय इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी व आदर्शवत ठरू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.