जांबुत ग्रामपंचायतीत राजकिय खलबते

सरपंच दत्तात्रय जोरींविरोधात अविश्वास ठराव मंजूर

0

जांबुत | दि. ५ (प्रफुल्ल बोंबे) 

शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात दाखल अविश्वास ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. सभेस ग्रामपंचायत सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अविश्वास ठरावाचा विषय मांडण्यात आला व त्यावर सविस्तर चर्चा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच जोरी यांच्या कार्यपद्धतीबाबत काही सदस्यांमध्ये तीव्र नाराजी होती. विकासकामांतील विलंब, निर्णय प्रक्रियेत सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच प्रशासनातील पारदर्शकतेअभावी सदस्यांमध्ये मतभेद वाढले होते. याच पार्श्वभूमीवर नियमानुसार अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.

चर्चेनंतर घेण्यात आलेल्या मतदानात उपस्थित बहुसंख्य सदस्यांनी ठरावाच्या बाजूने कौल दिल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला. या निर्णयाची अधिकृत नोंद इतिवृत्तात करण्यात आली असून सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

जांबुत ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घटना घडल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठराव मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीतील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता असून नवीन सरपंच निवडीसाठी हालचालींना वेग येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे गावात नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून सरपंचपदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तालुक्याचे लक्ष आता जांबुतमधील पुढील राजकीय घडामोडींवर लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.