रील मेकिंगचे वाढते आकर्षण : करिअर की भ्रम?

सोशल मीडियावरील प्रसिद्धीमागील वास्तव

0

टाकळी हाजी : | (साहेबराव लोखंडे)

डिजिटल क्रांतीच्या युगात सोशल मीडियावरील रील मेकिंग हा शब्द तरुणांच्या ओठांवरचा नवा मंत्र झाला आहे. काही सेकंदांचे व्हिडीओ तयार करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याची हौस सर्वत्र दिसून येते. पण या चमचमीत आकर्षणामागे दडलेले वास्तव किती स्थिर आहे, हा विचार करण्याची वेळ आली आहे.

रील बनविणे हे तांत्रिकदृष्ट्या अवघड नाही, थोडे प्रशिक्षण आणि सर्जनशील विचार पुरेसे ठरतात. पण या माध्यमातून उत्पन्नाचा निश्चित स्रोत मिळेलच, अशी खात्री देता येत नाही. अनेक तरुण वेळ, पैसा आणि ऊर्जा रील बनवण्यामध्ये गुंतवतात, मात्र आर्थिक यशाचे दरवाजे काही मोजक्यांसाठीच उघडतात. बाकीच्यांना व्हायरल होण्याच्या मोहात वेळ आणि आयुष्य वाया घालवण्याचा धोका संभवतो.

राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात रील निर्मात्यांची काही प्रमाणात मागणी आहे, पण तीही मर्यादित आणि तात्पुरती. या क्षेत्रात ना कोणतेही स्थायित्व, ना भविष्याची हमी. सतत बदलणाऱ्या ट्रेंड चा पाठलाग करताना अनेक तरुण मानसिक थकव्याचे आणि अपयशाचे शिकार होतात.

यापलीकडे, प्रसिद्धीच्या हव्यासात काही तरुण चुकीच्या मार्गांकडे वळताना दिसत आहेत. अनेकांचा भडक मजकूर, खोट्या बातम्या, अश्लीलता यांचा आधार घेत लोकप्रिय होण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे समाजात चुकीचे संदेश पसरत असून नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

रील मेकिंगला स्वयंरोजगार म्हणून स्वीकारणे म्हणजे अनिश्चिततेच्या प्रवाहात होडी सोडण्यासारखे आहे. काही यशस्वी उदाहरणे खरोखर प्रेरणादायी असली, तरी ती अपवाद आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला ते यश येईलच असे नाही.

 

प्रसिद्धीच्या झगमगाटामागील सावल्याही पाहाव्यात

हा संदेश आजच्या तरुणांनी लक्षात घेतला पाहिजे. करिअर निवडताना शिक्षण, कौशल्यविकास, आणि दीर्घकालीन योजना या तीन गोष्टींचा नीट विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा, रील मेकिंगचे हे आकर्षण एक क्षणभंगुर स्वप्न ठरू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.