९ जूनला शिरूरमध्ये महसूल लोक अदालत

तडजोडीतून निकालासाठी नागरिकांना सुवर्णसंधी

0

टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे)

शिरूर तालुक्यातील विविध न्यायप्रविष्ट महसूल प्रकरणांचे तडजोडीने निपटारा करण्यासाठी महसूल लोक अदालत ९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी शिरूर यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या लोक अदालतीत नागरिकांनी दाखल केलेल्या विविध प्रकारच्या न्यायप्रविष्ट दाव्यांचा निपटारा परस्पर संमतीने व तडजोडीच्या माध्यमातून करण्यात येईल. संबंधित कार्यालयात प्रलंबित असलेले अर्ज, प्रमाणपत्रांसंबंधीच्या तक्रारी, फेरफार, जमाबंदी व इतर प्रशासकीय बाबी निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील:
अर्ज सादर करण्याची मुदत (नमुना अ): २१ मे २०२५ ते ३० मे २०२५
पूर्वतयारी बैठक: २ जून २०२५
मुख्य लोक अदालत: ९ जून २०२५

लोक अदालतीत निकाली काढण्यात येणाऱ्या प्रमुख दाव्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पातळीवरील प्रलंबित वाद
तहसीलदार स्तरावरील जात, उत्पन्न, निवासी व वारस प्रमाणपत्रांसंबंधी दावे
मंडळ अधिकारी स्तरावरील जमाबंदी, फेरफार, फेरनोंदणी व नकाशा सुधारणा यांसारखे प्रशासकीय प्रकरणे

सुलभ अर्ज प्रक्रिया:
नागरिकांना या लोक अदालतीसाठी ईमेलद्वारेही अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज खालील ईमेल पत्त्यावर पाठवावेत:
ईमेल: tahsilshirur@gmail.com

हा उपक्रम नागरिकांच्या न्यायालयीन खर्चात बचत करतोच, पण वेळेची बचतही करतो. त्यामुळे प्रलंबित दावे जलदगतीने व न्यायालयीन प्रक्रियेच्या बाहेर निकालात काढण्याची ही उत्तम संधी आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.