शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षकांची मनमानी

नियमबाह्य नियुक्त्या, सरकारी एसीचा गैरवापर आणि नागरिकांची आर्थिक पिळवणूक; कारवाईची मागणी जोरात

0

शिरूर | प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चर्चेचं प्रमुख कारण ठरत आहे, उपअधीक्षक अमोल भोसले यांचा मनमानी कारभार. त्यांच्या कार्यशैलीवर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर येत असून, कार्यालयातील प्रशासकीय व्यवहार पूर्णपणे बेजबाबदारपणे चालवले जात असल्याचा आरोप होत आहे.

भोसले यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता चार ‘झिरो’ कर्मचारी स्वतःच्या मनाप्रमाणे नेमल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांचा पगार कोण करतंय, यावर सध्या प्रचंड गूढ निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांकडून आर्थिक लाच उकळली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, नियुक्त्या बेकायदेशीर असल्याने हा प्रकार गंभीर स्वरूपाचा गैरप्रकार ठरत आहे.

तसेच, भोसले यांनी स्वतःच्या केबिनमध्ये विनापरवाना एसी बसवून घेतल्याची माहितीही पुढे आली आहे. शासनाची कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता बसवण्यात आलेल्या एसीचा विजेचा खर्च शासनाच्या तिजोरीवर लादला जात आहे. यामुळे शासनाच्या निधीचा सरळ गैरवापर होत असून, नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.

दरम्यान, ‘साहेब एसीच्या थंडगार हवेत निवांत बसलेले आणि नागरिक ताटकळत उभे’ अशी उपरोधिक स्थिती या कार्यालयात निर्माण झाली आहे. याविरोधात स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, तातडीने चौकशी करून भोसले यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

शासकीय कार्यालयांत असा सत्तेचा आणि नियमांचा उघडपणे गैरवापर खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अनेक सामाजिक संघटनांनी दिला असून, सरकार आणि महसूल विभाग या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई करणार का? हा प्रश्न आता नागरिकांना सतावतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.