बाल वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगात आषाढी वारीचा उत्सव
शाळांमधून भक्तिभावाने दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन
पिंपरखेड | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला समर्पित असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरूर तालुक्याच्या बेट भागातील विविध शाळांमध्ये उत्साहात व भक्तिभावाने दिंडी व पालखी सोहळा पार पडला. परंपरेचे जतन करत विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने दिंडीत सहभाग घेतला.
पिंपरखेड येथील फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूल, जांबूत येथील जय मल्हार हायस्कूल व रेसिंग स्टार प्रि-प्रायमरी स्कूल तसेच काठापूर खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळांमध्ये बालचमुनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंगाच्या गजरात “जय जय रामकृष्ण हरे” असा जयघोष करत गावातून भव्य पालखी मिरवणूक काढली.
या सोहळ्यात लहान मुलांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई तसेच विठ्ठल-रखुमाई यांच्या वेशात सहभागी होत वारकरी संप्रदायातील भक्ती परंपरेचे दर्शन घडवले. काही मुलांनी डोक्यावर तुळस रोवलेली टोपी, तर काहींनी टाळ, मृदुंग घेत भक्तिभावाने दिंडीत सहभाग घेतला.
या वेळी मुख्याध्यापक सुनिल जाधव यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमधून आपल्या संस्कृतीचे वारसत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते, हे खूपच अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच भक्तिभाव व संस्कार रोवले जातात.”
प्राचार्या सुशिता बराटे यांनी यावेळी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी अत्यंत मनोभावे पारंपरिक वेशभूषा स्वीकारून पालखी उत्सव साजरा केला. हा उपक्रम केवळ साजरा करण्यापुरता नसून आपल्या परंपरेचे जतन करणारा एक महत्त्वपूर्ण अध्याय ठरतो.”
या उपक्रमाचे कौतुक होत असून, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेत शाळांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.