मेंढ्यांच्या रक्षणासाठी जीव धोक्यात: बिबट्याला हुसकावले, मेंढपाळ जखमी
"धैर्यशील मेंढपाळाची बिबट्याशी झुंज : मेंढ्यांच्या रक्षणासाठी जीवाची बाजी"
टाकळी हाजी | प्रतिनिधी
टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील खटाटे वस्तीवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. हुकूम भिवा काळे (वय ६५), हे मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या रक्षणासाठी बिबट्याशी झुंजले. त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा प्रतिकार करत आपला व मेंढ्यांचा जीव वाचवला, मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.
काळे यांनी भाऊ घोडे यांच्या शेतात वाघूर लावली होती. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास बिबट्याने वाघुरीकडे झेप घेतली. काळे हे त्या वेळी बाहेर झोपले होते. बिबट्याने आत झेप घेत असताना त्याचा पंजा थेट काळे यांच्या डोक्यावर आदळला. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला खोल जखमा झाल्या.
जखमी अवस्थेतही त्यांनी आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार केला, त्यामुळे बिबट्या पळून गेला. मात्र डोक्याला झालेल्या जखमांमुळे रक्तस्त्राव सुरू झाला होता. तरीही, काळे यांनी आपल्या मेंढ्यांची काळजी घेत जागरण करत रात्र काढली.
सकाळी शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन वनविभागाला कळवले. वनपाल गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लहू केसकर आणि वन कर्मचारी महेंद्र दाते यांनी घटनास्थळी धाव घेत काळे यांना मंचर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तातडीने बिबट्याला पकडण्याची मागणी केल्याने वनविभागाने या भागात पिंजरा लावून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.