आधुनिक काळातील शिक्षकाची भूमिका
सत्यशोध : प्रतिनिधी
बदल हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गात प्रत्येक क्षणाला बदल होत असतो आणि या बदलानुसार निसर्गातील प्रत्येक जीव स्वतः मध्ये बदल घडवून आणत असतो. जसा काळ बदलतो तसा प्रत्येक जीवाला स्वतःमध्ये बदल करावा लागतो म्हणूनच म्हटले जाते.
“ कालाय तस्मै नम: “
काळ हा बलवान आहे. काळानुसार आपण स्वतः मध्ये बदल केला नाही तर काळाच्या ओघात नष्ट व्हावे लागते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अतिशय प्रचंड मोठा असणारा डायनासोर हा प्राणी काळाच्या ओघात नष्ट झाला परंतु मुंगी आजही जिवंत आहे. याचे कारण म्हणजे डायनासोर स्वतः मध्ये बदल करू शकला नाही मुंगीने मात्र स्वतः मध्ये काळानुसार बदल केला. म्हणूनच ती आजही आपले अस्तित्व टिकून आहे. काळ झपाट्याने बदलत आहे. प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहे. सध्याच्या काळात गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने प्रत्येक क्षेत्रात प्रचंड बदल घडून आणला आहे. या गोष्टीला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. आज काळानुसार आपणा शिक्षकांनाही आपली भूमिका बदलावी लागली आहे. हातात खडू आणि फळा याद्वारे आपण शिकवितो परंतु त्याचबरोबर आता मोबाईल, लॅपटॉप च्या सहाय्याने आपण शिकवत आहे. सध्याच्या काळात शिक्षकाला स्वत: ला डिजिटल करणे क्रमप्राप्त झाले आहे.
आज इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले आहे. प्रत्येक घरात मोबाईल पोहोचला आहे. ज्ञानाच्या शाखा विस्तारलेल्या आहेत. आजचा विद्यार्थी अपडेट आहे. अशा विद्यार्थ्यासमोर जाताना स्वतः ला परिपूर्ण तयारीनिशी जावे लागत आहे. कोरोना साथीमध्ये तर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण हाच एकमेव पर्याय उरलेला होता. या ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना तंत्रज्ञान अवगत असणं काळाची गरज झाली आहे. आज प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे. खडू आणि फळा घेऊन न शिकवता विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा वापर करून शिकवले पाहिजे. शिक्षकांना आता केवळ पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही तर शैक्षणिक क्षेत्रात विविध होणारे बदल नवीन शोध यांची माहिती आपल्या शिक्षकांना असणे गरजेचे आहे. विविध डिजिटल साधनांद्वारे आपले अध्यापन कसे प्रभावी होईल यासाठी प्रत्येक शिक्षकांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे
शिक्षकांना अध्ययन अनुभव देण्यासाठी विविध डिजिटल साधनांचा वापर करणे गरजेचे आहे ज्यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट बोर्ड, गुगल फार्म तयार करणे, विविध शै. ऍप अशा विविध साधनांद्वारे अध्ययन अनुभव जास्तीत जास्त जिवंत कसे करता येईल यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शन न करता मित्र होऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करणं गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना काय शिकवावे यापेक्षा कसे शिकवावे यावर शिक्षकांनी विचार करणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जातात. त्याचा वाईट परिणाम होतो यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याविषयीचे ज्ञान त्यांना देणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य बनले आहे. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देणे ही गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भारताचा नागरिक तयार होणार आहे. त्यांच्यावर देशाची जबाबदारी असणार आहे म्हणूनच शिक्षकांनी आपली भूमिका बदलणे आवश्यक आहे.
सुनिता फापाळे( उपशिक्षिका )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड
तालुका शिरूर जिल्हा पुणे .