आषाढी एकादशीनिमित्त सार्थक प्री-प्रायमरी स्कूलमध्ये पारंपरिक ग्रंथदिंडीचे आयोजन
चिमुकल्यांनी अनुभवला भक्तीरसात न्हालेला वारीसोहळा
शिरूर | प्रतिनिधी
संतांच्या वारकरी परंपरेला उजाळा देणारा एक आगळावेगळा उपक्रम सार्थक प्री-प्रायमरी स्कूल, वडनेर खुर्द ( ता. शिरूर) येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक ग्रंथदिंडीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भक्तिमय वातावरण, चिमुकल्यांचा उत्साह आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सोहळा विशेष लक्षवेधी ठरला.
या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ या ग्रंथांचे पूजन करून भक्तीभावाने नटलेल्या वारीचा अनुभव घेतला. पारंपरिक पोशाखातील मुला-मुलींनी डोक्यावर गांधीटोपी, भगवे झेंडे, टाळ-मृदंग हातात घेऊन “हरिनामाचा गजर” केला. मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळस घेऊन शाळेपासून गुरुनाथ मंदिरापर्यंत दिंडी फेरी काढली.
मंदिर परिसरात विद्यार्थ्यांसह पालकांनीही फुगडी नृत्यात सहभागी होत आनंद साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी पूजनाने झाली. त्यानंतर भगवद्गीतेतील १२व्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी माता पालकांसाठी ‘पैठणीचा खेळ’ हा विशेष आकर्षण ठरला. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या माता पालक हर्षदा भुकन यांना सन्मानपूर्वक पैठणी भेट देण्यात आली.
कार्यक्रमात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग व ओव्यांनी वातावरण भारावून गेले. मा.उपसरपंच विक्रम निचित यांनी विद्यार्थ्यांच्या मनात भक्ती, संस्कार आणि संस्कृतीचे बीज रोवणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित करत शाळेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संदेश निचित आणि बारकु निचित यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट अल्पोपहार देण्यात आला. पालक व ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, “संस्कृतीशी नाळ जपणाऱ्या शिक्षणसंस्थेचे हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे,” अशा प्रतिक्रिया शिक्षण वर्तुळातून उमटत आहेत.