निघोज | अ.नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील प्रमोद जालिंदर लोखंडे (वय 20) याची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली असून गावात आणि लोखंडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. प्रतिकूल परिस्थितीतून वर येत साध्या शेतकरी कुटुंबातील मुलाने मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
प्रमोदचे मूळ घराणे अत्यंत मोठे आणि कष्टाळू आहे. –आजी स्व . देऊबाई व आजोबा स्व. गेणभाऊ मारुती लोखंडे यांना सहा मुलगे व एक मुलगी असा मोठा परिवार. यातील सर्वात धाकटा मुलगा जालिंदर लोखंडे यांचे बालपणही संघर्षमय. परिस्थितीमुळे शिक्षण लवकर सोडावे लागले आणि लहानपणापासूनच विहीर खोदणे, शेतातील कामे, तसेच घरातील गावरान गायी चरायला नेण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.
कमी वयातच जालिंदर यांचा मामाची मुलगी मंगल हिच्याशी विवाह झाला, संसार सुरू झाला आणि काही काळातच कुटुंबाची जबाबदारी अचानक खांद्यावर आली. “आपण शिकू शकलो नाही, पण मुलांनी शिक्षण घ्यायलाच हवं,” या दृढ निर्धारातून त्यांनी गवंडी काम, वेल्डिंग, शेती अशा सर्व कामांतून कुटुंब उभं केलं. पत्नी मंगल यांची साथ सतत मजबूत आधार ठरली.
या कष्टांच्या वातावरणात प्रमोदनेही कठोर मेहनतीचा मार्ग स्विकारला. बारावीनंतर पोलिस भरतीसाठी प्रयत्न करताना पहिल्या प्रयत्नात अगदी थोडक्यात संधी हुकली. मात्र अपयशावर मात करत त्याने तयारी सुरू ठेवली. अखेर त्याच्या जिद्दीला यश मिळत इंडियन आर्मीमध्ये निवड होण्याचा मान त्याने मिळवला.
प्रमोदचे हे यश आई–वडिलांच्या कष्टांचे चीज ठरले आहे. त्याची ही यशोगाथा केवळ प्रमोदचा अभिमान नसून संपूर्ण लोखंडे परिवारासाठी गौरवाचा क्षण ठरली आहे. देशसेवेच्या या पवित्र मार्गावर पाऊल टाकणाऱ्या प्रमोदचे घरातील सर्वांनी, नातेवाईक आणि मोरवाडी परिसरातील ग्रामस्थ तसेच गावकऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.