सुरेखा निचित यांना लाइफटाईम अचीवमेंट बेस्ट टीचर अवॉर्ड

मुंबईतील इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडचा मानाचा सन्मान

0

टाकळी हाजी | (दिनांक १४ नोव्हेंबर २०२५)

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुंबईतील इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड संस्थेतर्फे शिरूर येथील छत्रपती शिक्षण संस्थेच्या विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत शिक्षिका सुरेखा राहुल निचित यांना ‘लाइफटाईम अचीवमेंट बेस्ट टीचर अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात व दिमाखात हा गौरव सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला देशभरातील नामांकित शाळांचे प्राचार्य, समन्वयक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे हा मानाचा पुरस्कार भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी आणि प्रख्यात टेनिसपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते सुरेखा निचित यांना प्रदान करण्यात आला.

या वेळी डॉ. बेदी म्हणाल्या, “आदर्श विद्यार्थी घडवणे हीच शिक्षकांची सर्वोच्च जवाबदारी असून सुसंस्कृत भारताचा पाया शिक्षणातच आहे.” तर सायना नेहवाल यांनी मत व्यक्त केले की, “ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत; त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवणे ही समाजाची जबाबदारी आहे.” राष्ट्रीय पातळीवरील या भव्य कार्यक्रमाचे आयोजन इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडचे चेअरमन मधुमती मसारकल व अध्यक्ष जगदीश मसारकल यांनी केले होते.

या यशाबद्दल राज्य लोकसेवा आयोग माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, संस्थाध्यक्ष राजेंद्र थिटे, माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समितीचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर गावडे, बाबाजी गावडे, मुख्याध्यापिका मारिया साठे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूअण्णा घोडे, पं.स. सदस्य डॉ. सुभाष पोकळे, शिक्षक पतसंस्थेच्या सभापती शर्मिला निचित, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे,पारनेर तालुका सीड्स, पेस्टिसाइडस अँड फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल निचित तसेच ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

या सन्मानामुळे शिरूर शहर, वडनेर–निघोज परिसरासह संपूर्ण शिक्षकवर्गाचे नाव अभिमानाने उजळल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली

सुरेखा निचित या वडनेर गावचे माजी आदर्श सरपंच सुरेशभाऊ निचित यांच्या सुनबाई असून, उद्योजक राहुल निचित यांच्या सौभाग्यवती आहेत. अध्यापनासोबत सामाजिक उपक्रमातही त्या सक्रिय असतात. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक रंगनाथ निचित आणि विमलताई निचित यांच्या कार्यातूनच प्रेरणा लाभल्याचे त्या अभिमानाने सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.