खंडाळेच्या ग्रामविकासात गहिनीनाथ नरवडे यांचे अनमोल योगदान
सभामंडपाच्या बांधकामाला नवी दिशा.. नरवडे यांचे सोळा लाखांचे योगदान
शिरूर : ( साहेबराव लोखंडे)
खंडाळे (ता. शिरूर) गावच्या पंचक्रोशीतील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराजांच्या प्रांगणात उभारण्यात येणारे सभामंडपाचे काम निधीअभावी थांबल्याने गावातील युवा उद्योजक गहिनीनाथ नरवडे यांनी उदार अंतःकरणाने पुढे येत तब्बल सोळा लाखांचे दान जाहीर केले. त्यांच्या या योगदानामुळे थांबलेले काम पुन्हा वेगाने सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या स्वप्नांना नवे पंख लाभले आहेत.
हा सभामंडप म्हणजे गावातील धार्मिक समारंभ, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक भक्कम व्यासपीठ ठरणार आहे. या कामासाठी विश्वंभर नरवडे, किरण दरवडे, मेजर राजू नरवडे, विशाल नरवडे, चांगदेव नरवडे यांच्यासह अनेकांनी निधी उभारणीसाठी प्रयत्न केले होते, मात्र अपेक्षित मदत न मिळाल्याने काम रखडले होते. अखेर गहिनीनाथ नरवडे यांच्या सुवर्णदानामुळे या कार्याला नवसंजीवनी मिळाली.
अलीकडेच पार पडलेला भूमिपूजन सोहळा हा गावाच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला. ग्रामस्थांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि आनंदाचा गजर यामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गावातील प्रत्येक उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम नव्या दिमाखात पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“आपण जे काही आहोत ते गावातील संस्कारांमुळेच. म्हणून गावासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,” असे मनोगत गहिनीनाथ नरवडे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या भावनेने ग्रामस्थ भारावून गेले असून अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, वीज वा पाणीपुरवठा एवढाच मर्यादित नव्हे, तर सांस्कृतिक व सामाजिक जीवनाला दिशा देणाऱ्या पायाभूत सुविधा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीने नरवडे यांचे हे दान खंडाळ्याच्या विकासाच्या इतिहासात सुवर्णपान ठरणार आहे. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे गावाला एक नवा आदर्श मिळाला असून हे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.