टाकळी हाजी | ( साहेबराव लोखंडे )
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील बेट भागातील विविध गावांमधून निघालेल्या दिंड्यांनी भक्तिभावात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आणि संत निळोबाराय पालखी सोहळा पिंपळनेर ते पंढरपूर या दोन मार्गांनी हा सोहळा साजरा होत आहे.या दोन्हीही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सरपंच अरुणाताई घोडे यांनी या अलौकिक सोहळ्याचा आनंद घेतला.
या वारीमध्ये टाकळी हाजी, कवठे येमाई, आमदाबाद, वडनेर, फाकटे, जांबूत, चांडोह, म्हसे, निघोज, गाडीलगाव आदी गावांतील दिंड्या तसेच माळवाडी, निमगाव दुडे, पिंपरखेड, काठापूर, सविंदणे, मलठण, मिडगूलवाडी, कान्हुर मेसाई, निमगाव भोगी येथील हजारो भाविक वारकरी सहभागी झाले आहेत.
या दिंड्यांना आणि वारकऱ्यांना टाकळी हाजीच्या विद्यमान सरपंच आणि शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणाताई दामुशेठ घोडे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रत्येक दिंडीत जाऊन वारकऱ्यांची मनपूर्वक विचारपूस केली, हरिनाम संकीर्तनात सहभाग घेत भक्तिरसात चिंब झाल्या. जनमानसातील लोकप्रिय नेते आदर्श सरपंच दामूआण्णा घोडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अरुणाताईंनी यावेळी पायी वारीचा अनुभव घेत वारकऱ्यांमध्ये आपलेपणा निर्माण केला.
वारकऱ्यांनी त्यांच्या या सेवाभावी उपस्थितीचे मनापासून स्वागत केले. वारीच्या निमित्ताने अरुणाताईंनी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या, “गेली वीस वर्षे जनतेची सेवा करण्याची मिळालेली संधी म्हणजेच पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. त्याच्या कृपेने आमची ही जनसेवा अविरत सुरू राहो. पांडुरंगाचे दर्शन म्हणजे साक्षात परब्रह्म भेटल्याचा अनुभव आहे. आम्ही जनतेच्या सेवेत पांडुरंग पाहतो.”
वारीच्या निमित्ताने निर्माण होणारा भक्तिभाव, एकोपा आणि सामाजिक सलोखा यालाच खऱ्या अर्थाने संत परंपरेचा वारसा मानले पाहिजे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.