पोलिसांच्या मदतीने शिक्षणाच्या प्रवासाला नवा वेग

गरजू विद्यार्थिनीला नवी सायकल

0

शिरूर | प्रतिनिधी

शिक्षणासाठी दररोज तब्बल ३ किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या गरजू विद्यार्थिनीला नवी सायकल भेट देत शिरूर पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पोलीस दुरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संपत खबाले यांनी आर्या हिरालाल भोसले या नववीतील विद्यार्थिनीला स्वतः नवी सायकल प्रदान केली.

सामाजिक कार्यकर्ते हिरालाल भोसले यांनी खबाले यांच्याकडे आर्या हिच्या जुन्या सायकलच्या दुरुस्तीबाबत विनंती केली होती. मात्र विद्यार्थिनीची गरज आणि परिस्थिती लक्षात घेत खबाले यांनी अधिक संवेदनशीलता दाखवत तिच्यासाठी थेट नवीन सायकल घेण्याचा निर्णय घेतला.

या उपक्रमामुळे आर्या हिला रोजच्या शालेय प्रवासात मोठा दिलासा मिळणार असून, आता ती अभ्यासासाठी अधिक वेळ देऊ शकेल. या कृतीमुळे पोलीस अधिकारी खबाले यांच्यावर “शिक्षणप्रेमी आणि समाजाभिमुख पोलीस” अशी प्रशंसायोग्य छाप उमटली आहे.

यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, बाळासाहेब भवर, तसेच मांडवगण पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी टेंगले व वाघ उपस्थित होते.

 

अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे हे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, पोलिस हवालदार खबाले  यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.