शिरूरमध्ये हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा यशस्वी शोध
पोलिसांची तांत्रिक कौशल्यावर आधारित तत्पर कारवाई
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
शिरूर शहरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा अवघ्या दोन दिवसांत यशस्वी शोध घेऊन त्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे सोपवण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पार पाडली आहे. सदर कारवाई पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेचे आणि तांत्रिक पातळीवरील प्रभावी तपास कौशल्याचे उदाहरण ठरली आहे.
दिनांक १६ मे व १७ मे २०२५ रोजी शिरूर शहरातील दोन अल्पवयीन मुली वेगवेगळ्या ठिकाणांहून कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याचे प्रकार समोर आले होते. दोन्ही प्रकरणांमध्ये शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे देण्यात आली होती.
मुलींकडे कोणताही मोबाईल फोन नसल्याने, तसेच त्यांनी कुठे व कशासाठी जाण्याचे पालकांना काहीच सांगितले नसल्याने या प्रकरणांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो. नि. श्री संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथक गठित केले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने सर्वतोपरी प्रयत्न करत अखेर दिनांक १८ मे रोजी दोन्ही मुलींना शोधून काढले.
प्राथमिक चौकशीत, या मुलींनी केवळ किरकोळ कौटुंबिक वादामुळे रागाच्या भरात घर सोडल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानंतर दोन्ही मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
शिरूर पोलीसांची ही तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असून, या कामगिरीसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले.
ही शोध मोहिम पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दीपक राऊत, अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, सचिन भोई, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, अशोक चितारे, तसेच महिला अंमलदार गोदावरी धंदरे व कल्याणी कोडवते यांनी यशस्वीपणे पार पाडली. या पथकाच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.