अध्यात्मिकतेचा संगम लाभलेला विवाह सोहळा

विठ्ठलनामाच्या जयघोषात नवविवाहितांची आगळीवेगळी एन्ट्री

0

टाकळी हाजी | 

सध्या लग्न समारंभ म्हटले की डीजेचा गोंगाट, झगमगाट आणि फॅन्सी फॅशन यांचा भडीमार पाहायला मिळतो. मात्र, टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील कांदळकर-गावडे कुटुंबीयांनी आपल्या मुला-मुलीच्या विवाहप्रसंगी अध्यात्मिकतेचा सुगंध दरवळवत एक आगळीवेगळी आणि अनुकरणीय परंपरा निर्माण केली.

बुधवारी (दि.१४ ) कुंड पर्यटन स्थळी पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात नवरदेव-नवरीची एन्ट्री पारंपरिक डीजेच्या गजरात नव्हे, तर “विठ्ठल-विठ्ठल जय हरी विठ्ठल” च्या भक्तिगर्जनेत झाली. आळंदी येथून आलेल्या ह.भ.प.नंदू महाराज गोरे यांच्या सोबत आलेल्या भजन मंडळींनी टाळ-मृदुंगाच्या साथीनं विठ्ठलनामाचा जयघोष करत वातावरण भक्तिमय केलं.

नवविवाहितांच्या हातात विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, समोर वारकरी आणि शिस्तबद्ध टाळ-मृदंगाचा गजर असल्याने, संपूर्ण सोहळा अध्यात्मिकतेनं भारलेला होता. आधुनिक धिंगाणा टाळून, पारंपरिक, सात्विक आणि श्रध्दाभावाने भरलेला विवाह समारंभ कांदळकर आणि गावडे परिवाराने संपन्न केला.

या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे उपस्थित पाहुण्यांनी मन:पूर्वक स्वागत केले असून, हा विवाह केवळ एक सामाजिक घटना न राहता, परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा आणि नव्या पिढीला मूल्यांची जाणीव करून देणारा ठरल्याचं मत गावकऱ्यांसह पाहुण्यांनी व्यक्त केलं.

अशा अध्यात्मिक व अनुशासित विवाहांना समाजात अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.