धर्मांतराच्या विरोधात टाकळी हाजीमध्ये संतप्त भावना ; विविध हिंदू संघटना एकत्र
शिरूर तालुक्यात हजारो नागरिकांनी धर्मांतर केल्याची चर्चा
टाकळी हाजी |
टाकळी हाजी ( ता.शिरुर) येथील एका तरुणाने जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रयत्न झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर आंबेगाव हिंदू धर्मजागरण समिती, शिवबा संघटना, वारकरी संघटना व बजरंग दल यांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाची हाक दिली. शनिवारी (दि. ३) हनुमान मंदिर येथे आयोजित सभेत मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली.
गुरुवारी (दि. १) राहुल गायकवाड यांनी सात जणांविरुद्ध जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याची तक्रार टाकळी हाजी पोलिस दुरक्षेत्रात दिली होती. तक्रारीनुसार, आरोपींनी आर्थिक मदतीचे आमिष दाखवत बायबल वाचण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला तसेच हिंदू धर्माच्या देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रशांत घोडे, मोजस डेव्हिड, अमोल गायकवाड, योगेश रक्षत, जेसी अॅन्थनी, कुणाल भावणे आणि सिद्धांत कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास टाकळी हाजी पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.
या प्रकारानंतर गावात संतप्त भावना निर्माण झाल्या असून, गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात अशा प्रकारचे धर्मांतर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अवमानकारक कृतींना विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला.
“धर्मांतरासाठी लोकांवर दबाव टाकणे, हिंदू देवतांचा अवमान करणे हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. प्रशासनाने कठोर कारवाई करावी.”
— महेश लांडगे, आमदार, भाजपा
“चर्च परिसरात प्रार्थनेच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण व धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. याला आता पूर्णविराम हवा.”
— सोमनाथ भाकरे, अध्यक्ष, शिवबा संघटना