लग्नात गोंधळ, तरुणास मारहाण : पोलिस कर्मचाऱ्यासह सात जणांवर गुन्हा
शिरूर | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथील मळगंगा लॉन्समध्ये सुरु असलेल्या एका लग्न समारंभात अचानक निर्माण झालेल्या वादातून मोठी हाणामारी झाली. HR विभागात काम करणाऱ्या तरुणासोबत फिरत असल्याच्या कारणावरून एका पोलिस कर्मचाऱ्यासह सात जणांनी तरुणाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना ३० एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी फिर्यादी अक्षय फक्कड गि-हे (वय २४, रा. तडोंबाचीवाडी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चंद्रकांत सुभाष गव्हाणे (पोलीस कर्मचारी), पप्पु अंबादास पवार, सुरंजन बिजम गव्हाणे, प्रविण अंबादास पवार (सर्व रा. आण्णापुर) तसेच तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, ते अजय गव्हाणे व विशाल पवार यांच्यासोबत नातेवाईकांच्या लग्नासाठी लॉन्सवर गेले होते. यावेळी आरोपींनी विशाल पवार यास “तु HR सोबत का फिरतो?” असा जाब विचारून त्याच्यावर वाद उकरून काढला. यातून वाद विकोपाला जात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अक्षय गि-हे व अजय गव्हाणे यांना देखील आरोपींनी इतर साथीदारांना बोलावून घेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली. “तुमचा इथे काय संबंध? निघून जा, नाहीतर खल्लास करून टाकू,” अशी धमकी देण्यात आली.
घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत वाद निवळवण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या अवस्थेत तात्काळ तक्रार न करता, नंतर कुटुंबीयांच्या समजावणीने अक्षय गि-हे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार उबाळे करत असून, पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिस कर्मचारीच गुंडगिरी करत असल्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक पुणे ग्रामीण यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सामाजिक कार्यक्रमात वाढणाऱ्या हिंसक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.