टाकळी हाजी ग्रामपंचायतने साबळेवाडी गावठाण हद्दीतील अतिक्रमण हटविले
टाकळी हाजी |
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडी गावठाण हद्दीतील साडेसहा एकर क्षेत्रावरील अतिक्रमणावर सोमवारी (दि.१७) ग्रामपंचायतने कारवाईचा बडगा उगारला. पोलीस संरक्षणात हद्द निश्चित करून खांब रोवण्यात आले असून या हद्दीतील पिके तत्काळ काढून घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
हे अतिक्रमण काढण्यासाठी साबळेवाडी येथील संतोष मोहन साबळे यांनी गेल्या पाच वर्षांपासून शिरूर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि टाकळी हाजी ग्रामपंचायतकडे वारंवार पाठपुरावा केला असून दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणही केले होते. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर अखेर त्यांच्या लढ्याला यश आले.
अतिक्रमण धारकांना वेळोवेळी नोटीस देऊनही त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात होती. यामुळे सरपंच अरुणा घोडे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी पोलीस, अग्निशामक दल, महसूल विभाग, पंचायत समिती ,भूमी अभिलेख, आरोग्य केंद्र, कृषी , महावितरण, सार्वजनिक बांधकाम,पशुवैद्यकीय विभाग आदी विभागांना उपस्थित राहण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. अग्निशामक दलाच्या गाडीसह, रुग्णवाहिका, पोलीस, सर्व यंत्रणेचे व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे व विष्णू गाडीलकर यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून या कारवाईचा पंचनामा केला.
इतर अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले...
टाकळी हाजी परिसरात गावठाण व गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून साबळेवाडी गावठाण कारवाईनंतर मात्र अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांनी स्वतःच्या मालकीचे क्षेत्र असूनही गायरान जमिनी बळकावल्या आहेत. त्यामध्ये शेती, दुकान, घर, गैर सरकारी संस्था , स्वयंसेवी संस्था असे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून याबाबत तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.