टाकळी हाजी |
अवैधरीत्या गोवा येथील लोकल ब्रेड (रॉयल ब्लू) दारू घेऊन जाणारा ट्रक न्हावरे फाटा (ता.शिरुर) येथे तपासणीदरम्यान पकडून ६० लाख रुपये किमतीची दारू व १५ लाख रुपयांचा ट्रक असा ७५ लाख रुपयांचा माल शिरूर पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई सोमवारी (दि. १०) सायंकाळी ७ वाजता करण्यात आली. या कामगिरीबद्दल शिरूर पोलिसांचे अभिनंदन होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू पकडण्याची ही पहिलीच घटना आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास न्हावरे फाटा येथे वाहतूक पोलिस शेखर झाडबुके व आप्पासाहेब कदम हे पेट्रोलिंग करत होते. या वेळी तेथून जाणाऱ्या एका ट्रकमध्ये दारूचा वास येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तो ट्रक थांबवून त्याची तपासणी केली. या वेळी कापडाच्या गाठोड्याखाली दारूचे बॉक्स होते. त्याची तपासणी केली असता ट्रकमधून गोवा येथून नाशिक येथे या दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांना कळविले.
गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरिक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार भाग्यश्री जाधव आणि निराज पिसाळ घटनास्थळी आले व ट्रक ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आले. याप्रकरणी मोहम्मद इम्रान मोहम्मद सलीम शेख (वय ३७, रा. घाटकोपर, मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले असून, ट्रक (एमएच ४८ सीबी ३६०५) ताब्यात घेण्यात आला.