नाना पाटेकर यांच्या हस्ते रविवारी निघोज येथे वृक्ष बँकेचे उद्घाटन
टाकळी हाजी |
अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज (ता.पारनेर) येथील वृक्ष बँकेचा उद्घाटन सोहळा रविवारी ( दि.९) सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ यांनी दिली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, प्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर, प्रसिद्ध सिनेअभिनेते व पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे, सिनेलेखक अरविंद जगताप, खासदार नीलेश लंके, माजी खासदार सुजय विखे, आमदार काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याचे रसाळ यांनी सांगितले.
गावातील स्मशानभूमीतील वृक्ष बँकेचा उद्घाटन सोहळा दुपारी साडेतीन वाजता तसेच मीडिया सेंटरचे उद्घाटन साडेचार वाजता शिववाडी (निघोज) येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग नोंदवावा. असे आवाहन रसाळ यांनी केले आहे.