तब्बल चोवीस वर्षांनी भरला स्नेहमेळावा
गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा केला संकल्प
पिंपरखेड प्रतिनिधी (प्रफुल्ल बोंबे, दि. २८)
पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिपावली सणाचे औचित्य साधून तब्बल चोवीस वर्षांनी एकत्र येत जांबूत (ता.शिरूर) येथील चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी या स्नेहमेळाव्यात सन १९९८ मधील इयत्ता दहावी मधील बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत बालपणींच्या आठवणीमध्ये रमत मित्र-मैत्रिणीं समवेत विविध गप्पा गोष्टींचा आनंद लुटला.
यावेळी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या क्षेत्रातील कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रसंगी ज्ञानदान करणारे शिक्षक, शाळेची शिस्त, स्वच्छता, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, विद्यार्थ्यांच्या खोडकर स्वभावातील बाबींचा आवर्जून उल्लेख करत प्रत्येकाने आपण या शिक्षकांमुळे आणि शाळेमुळेच घडलो असे विनम्रपणे नमूद केले. दरम्यान मनीषा ताजवे, रामदास उंडे, जनार्दन बोटकर, अंजूम मोमीन, अर्चना बराटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी यापुढील काळात माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून दरवर्षी हुशार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध प्रकारे आर्थिक मदत करण्याचा संकल्प केला. यावेळी विकास डुकरे, सयाजी डुकरे, शरद डुकरे ,सुशीला डुकरे, विमल चव्हाण, रमेश आगळे ,रवींद्र येवले, राजेंद्र येवले, शांताराम भोर, राहुल डुकरे, श्रीराम चव्हाण ,नानाभाऊ पवार, गणेश भालेराव ,दिनेश तटटू आदि उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .राहुल भोसले यांनी केले, तर आभार कैलास डुकरे यांनी मानले.