तलाठी , मंडलाधिकारी जोमात : शेतकरी कोमात
साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील काही तलाठ्यांनी त्यांच्या कामाचा ताण कमी करताना, हिशोब ठेवण्यासाठी हाताखाली झिरो तलाठ्यांची फौजच नेमलेली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे . तलाठ्यांची व मंडलाधिका-यांची बहुतेक कामे हे झिरो तलाठी करीत असतात. काही ठिकाणी तर हे झिरोच हिरो बनले आहेत. व शेतक-यांना लुटायचा एकसुञी कार्यक्रम जोरात चालू आहे. परिणामी महसुल च्या कागदी कारभारात अनागोंदी होत असल्याचे दिसुन येत आहे.
शिरूर तालुक्यात १०५ हुन अधिक गावे व वाड्यावस्त्या आहेत.काही तलाठ्यांकडे एकापेक्षा जास्त गावांचा कारभार आहे. तलाठ्यांवर कामाचा ताण पडत असताना लोकांचे काम ही रेंगाळते, अनेक गावात आठ आठ दिवस तलाठ्याचे दर्शनही होत नाही. शिवाय बहुतेक तलाठी व मंडलाधिकारी सगळेच शिरूर शहरात किंवा आपल्या सोईच्या ठिकाणी राहत असल्याने त्यांचे सजाच्या ठिकाणी मन रमत नाही. गरज असल्याने लोक त्यांना भेटीसाठी ते सांगतील त्या ठिकाणी येतात.
एका पेक्षा जास्त गावे असल्याने साहजिकच कारभार करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी कोतवाल हे काम पाहत आहे तर काही ठिकाणी तलाठ्यांची व मंडलाधिका-यांची सगळी कामे झिरो तलाठीच करतात. अनेक गावांमध्ये तलाठी येत नसेल तरी काम मात्र सुरूच राहत असते. गावातील लोकांना ही एवढी सवय झाली आहे की मंडलाधिकारी व तलाठ्यांपेक्षा ते झिरो तलाठ्यांनाच कामे सांगून मोकळे होतात. मात्र याच परिस्थितीचा मंडलाधिकारी , तलाठी व झिरो तलाठी गैरफायदा उठवीत आहेत. कामासाठी सामान्यांची आर्थिक फसवणूक असून सामान्यांची यात फरफट होत आहे.
तसेच मंडलाधिकारी , तलाठी व झिरो तलाठ्यांनी लोकांकडून पैसे उकळण्यासाठी सध्या नवीन फंडा सुरु केला असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. या मध्ये खरेदी-विक्री करणा-यांच्या नावात बदल करणे , चुकीचा गट नंबर टाकणे , वारसनोंद करताना जाणुन-बुजून नावे कमी जास्त टाकणे या सारखे अनेक प्रकार करुन लोकांना मानसिक व अर्थिक ञास दिला जात आहे. तसेच अनेक सरकारी कागदपत्रे ही संबंधित झिरो तलाठ्यांच्याच हातात असल्यामुळे भविष्यात शिरुर तालुक्यात जमिनी बाबत काही घोटाळे झाले तर याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. कागदपत्रांमध्ये फेरबदल घडण्याचे प्रमाण वाढल्याने, वेळीस आळा न घातल्यास कागदपत्रांची वाट लागण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे.