नगर- पुणे महामार्गावरील अपघातातील आमदाबाद गावातील मृतांचा आकडा सहावर

0

 

टाकळी हाजी : वृत्तसेवा

गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेलेल्या तरुणांच्या अपघातात जागीच ४ जण ठार झालेले असताना त्यातून सावरताना शिरूर तालुक्यातील आमदाबादकरांना पुन्हा धक्का बसला असून अपघातातील गंभीर जखमी असलेला समाधान श्रावण साळवे (वय १८) यांच्या पाठोपाठ ओंकार जालिंदर गोरखे (वय १७) यांचाही नगर येथे उपचार सुरु असताना मृत्यु झाल्याने अपघातील मृतांचा आकडा सहावर पोहचला आहे .

बुधवारी (दि. २२) आमदाबाद येथील तरुण छोट्या टेम्पोतून शनिशिंगणापूर व देवगड येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर कामरगाव जवळ झालेल्या या अपघातात विजय अवचिते, राजेंद्र साळवे, मयूर साळवे व धीरज मोहिते यांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले होते. त्यापैकी समाधान श्रावण साळवे यांचा शनिवारी (दि.२५) तर ओंकार गोरखे यांचा रविवारी (दि.२६) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . ओंकार गोरखे हा मूळचा नगर जिल्ह्यातील असून तो शिक्षणासाठी मामाकडे आमदाबाद येथेच वास्तव्यास होता. समाधान साळवे व ओंकार गोरखे हे शालेय शिक्षण घेत होते. तसेच वाजंत्री कलाकार म्हणून परिसरात प्रसिद्ध होते. गावातील युवा कलावंत अपघातात मरण पावल्याने आमदाबाद ग्रामस्थांवर मोठी शोककळा पसरली आहे.

जखमी रुग्णांवर उपचार सुरू असून हे सर्वजण गरीब कुटुंबातील आहेत, त्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने माजी सरपंच योगेश थोरात, सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक माशेरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

शिरूर आंबेगावचे लोकप्रतिनिधी माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील,माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे या अपघातग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आमदाबाद येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.