शिवबा शिवदुर्ग संवर्धन मोहिम किल्ले प्रतापगड व किल्ले वासोटा
प्रवास वर्णन-ज्ञानेश्वर कवडे सर
ज्ञानेश्वर कवडे सर
माता मळगंगा देवीच्या पुण्यभूमीतून शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी शिवबा संघटनेच्या २२ व २३ व्या शिवदुर्ग संवर्धन मोहिम किल्ले प्रतापगड व किल्ले वासोटा चा श्री गणेशा झाला. पहाटे पाच तीस वाजता आमची ५४ मावळ्यांची बस निघोज येथून निघाली सर्वप्रथम टाकळी हाजी व शिरूर येथील काही मावळ्यांना घेतल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. प्रवासामध्ये ओम साई डेअरीचे मालक रायचंदशेठ गुंड यांनी साऊंड सिस्टिम सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवासामध्येच सर्वप्रथम शिवदुर्ग संवर्धन मोहिमेचे संकल्पक व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी सर्व सहभागी मावळ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.त्यानंतर मोहीम प्रमुख बबन शेठ तनपुरे यांनी सर्व मावळ्यांना आपली ओळख करून देण्यास विनंती केली.
या मोहिमेमध्ये विशेषत: निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष मा.वसंत कवाद सर,निघोजचे मा.सरपंच ठकाराम शेठ लंके , माळवाडी(टाकळी हाजी)चे विद्यमान सरपंच मा.सोमनाथशेठ भाकरे,उद्योजक रायचंदशेठ गुंड,उद्योजक नितीन भांबेरे,निघोज ग्रा.पं.सदस्य गणेश कवाद,मळंगगा ट्रस्टचे विश्वस्त विश्वास शेटे, या मान्यवरांबरोबरच दुर्गप्रेमी एस एस वाय साधक विलास हारदे, तापोला येथे हॉटेल व बोटिंग चे नियोजन करणारे उद्योजक अशोकशेठ ढवळे, टाकळी हाजीचे मळीभाऊ भाकरे व सहकारी, आत्तापर्यंतच्या सर्व दुर्ग संवर्धन मोहिमेमध्ये सहभागी असणारे बाबूशेठ व्यवहारे, उत्कृष्ट वक्ते व क्रिकेट समालोचक केशव शिंदे, गाडी खरेदी-विक्री व्यावसायिक बाळासाहेब भंडारी,शिवभक्त-शिवव्याख्याते अजयजी खोसे व सहकारी,कृषी व्यावसायिक नामदेवशेठ पांढरकर, विनोदी स्वभावाचे गणेशजी खोसे, मुंजाबा वीट कारखाना योगेशशेठ लंके,रोहन कळसकर, रामदास शेटे,दिनेश लामखडे, शिरूर येथील संतोषजी गायकवाड,शशिकांतजी गायकवाड साहेब व सहकारी, प्रसाद वरखडे, कृष्णा लंके,ओम पांढरकर,साहिल लंके, स्वप्निल जगदाळे,माऊली क्षिरसागर,ओंकार जाधव,विकी उकिरडे,अजित भाकरे,मयूर नायर,शरद भाकरे योगेश भाकरे,अमोल साळुंखे,सुनील कुरंदळे संजय झंजाड,सतीश पाचपुते,संजोग लामखडे सात्विक ,बाबा केदारी,आशिष लंके,बाबुराव बोरचटे,दत्ता धुमाळ आणि सातत्याने सर्व मोहिमेत अग्रस्थानी असणारे रामा सुपेकर तसेच सिद्धी व्यवहारे व सोहम शिंदे हे छोटे मावळे सुद्धा सहभागी झाले होते. या सर्वांनी आपापली ओळख सर्वांसमोर करून दिली.परिचयाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कवडे सर यांनी केले.
प्रवास अतिशय छान सुरू झाला होता.सकाळचा नाश्ता बरोबरच होता साडेनऊ ते दहाच्या दरम्यान चौफुला नारायणपूर मार्गावर बस थांबून त्या ठिकाणी नाश्ता झाला.पुन्हा प्रवास सुरू झाला आता खऱ्या अर्थाने गाण्यांची मैफिल सुरू झाली होती.अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे निघाोज नागरीचे अध्यक्ष वसंत कवाद सर, सरपंच सोमनाथ भाकरे, यांनी अतिशय उत्कृष्ट मराठी-हिंदी गीते तसेच अभंग म्हणत बसमधील वातावरण मंत्रमुग्ध केले. अनेकांनी विविध कला सादर करत या प्रवासात साथ दिली.दुपारी एक कधी वाजले हे समजलेच नाही.आम्ही महाबळेश्वर येथे पोहोचलो होतो. दुपारच्या भोजनासाठी सर्वांनी घरूनच भोजन आणलेले होते. सर्वांनी जैवविविधता उद्यानात दुपारचे एकत्रित भोजन घेतले. पुनश्च एकदा प्रवास सुरू झाला.आता आम्ही प्रतापगडाकडे प्रयाण केले होते. प्रवास सुरू असताना आजूबाजूला घाटमाथ्यावर असणारे स्ट्रॉबेरीचे मळे खूप सुंदर आणि विलोभनीय दृश्य मनाला मोहित करत होते. अचानक घाट उतरताना गाडी एका वळणावर नादुरुस्त झाली.गाडी दुरुस्त व्हायला एक तास लागणार होता आणि प्रतापगड सात किलोमीटर पुढे होता. आम्ही गाडी दुरुस्त होईपर्यंत पुढे पायी चालत निघालाे.आजूबाजूच्या स्ट्रॉबेरी मळ्यातील ताजी स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद घेतला. रस्त्याच्या कडेने ठिकठिकाणी स्ट्रॉबेरी चे स्टॉल लागलेले होते.अनेक लोक थांबून स्ट्रॉबेरी खरेदी करत असतानाचे दृश्य पाहत आम्ही पुढे चालत होतो. आता मात्र तीन किलोमीटर चालून झाल्यानंतर दुरुस्त झालेली आमची बस आली. आता दुपारचे चार वाजलेले होते.प्रतापगड करून आम्हाला संध्याकाळी तापोला या गावी आठ वाजेपर्यंत पोहोचायचे होते. शालेय सहलींचा काळ असल्याने प्रतापगड कडे जाणारी वाहतूक अरुंद रस्त्यामुळे जाम झालेली होती. महाराष्ट्रातील विविध शाळांतून आलेल्या मुलांचे चेहरे प्रतापगड पाहण्यासाठी आतुरलेले दिसत होते.वाहतूक जाम झाल्यामुळे आम्हीही पायी चालत पुन्हा तीन किलोमीटर गडाकडे चालत गेलो.शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशी महाराजांची ओळख निर्माण करणाऱ्या गडाकडे आम्ही प्रयान करत होतो.महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या किल्ल्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे अशा किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो होतो.
ज्या ठिकाणी पार्किंग आहे,त्या ठिकाणावरून किल्ल्याची सर्व तटबंदी दिसत होती.आजूबाजूला सर्व जावळीचे भयानक जंगल आहे.प्रथम पायरीनंतर सर्वप्रथम लागतो तो महादरवाजा..! अतिशय उत्कृष्ट असा महादरवाजाचा मार्ग तयार केलेला आहे,जवळ आल्यानंतर ही दरवाजा लक्षात येत नाही .जोपर्यंत आपण वर जात नाही तोपर्यंत दरवाजा लक्षात येत नाही तोफांचा मारा केला तरी हा दरवाजा अभेद्य राहील अशी रचना महाराजांनी दरवाजाची केलेली आहे.आजही साडेतीनशे वर्षांपूर्वीपासून महादरवाजा सूर्योदयापूर्वी उघडतात आणि सूर्यास्तापूर्वी बंद करतात. महा दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर द्वारपालाच्या खोल्या दिसून येतात त्या ठिकाणी एका बाजूला तोफ व दुसऱ्या बाजूला मशालीचे दगडी स्टॅन्ड ठेवलेले आहे. महादरवाज्याच्या डाव्या बाजूला जुनी वाट दिसते भवानी मंदिराकडे जाण्यासाठी ही वाट होती परंतु सध्या ती बंद आहे. महाद्वारासमोरच प्रवेश केल्यानंतर शिवप्रताप बुरुंज आपल्याला दिसतो या ठिकाणी खूप मोठा ध्वज उभारलेला आहे. या ठिकाणी सर्व मावळ्यांनी जमत
” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” अशा घोषणा दिल्या या ठिकाण चे वातावरण जयघोषाने शिवमय झाले. या बुरुजावर काही वेळ स्वच्छता मोहीम राबवली.त्यानंतर पुन्हा एकदा महाद्वाराकडे येऊन आम्ही नवीन रस्त्याने भवानी माता मंदिराकडे चालू लागलो. या वाटेने जात असताना उजव्या हाताला पाण्याचा एक तलाव दिसतो ज्या तलावाचा वापर पाणी पिण्यासाठी व्हायचा.यानंतर भवानी माता मंदिरात पोहोचल्यानंतर भवानी मातेच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन घेतले.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील या ठिकाणी पहावयास मिळते. मंदिराबाहेर सहा वेगवेगळ्या तोफा नजरेस पडतात तसेच या ठिकाणी हस्तकला वस्तू प्रदर्शन पाहायला मिळते. येथून पुढे आम्ही सभा मंडप व नगारखाण्याकडे गेलो. या ठिकाणी दोन दीपमाळा दिसून येतात. नगारखान्यातून खाली पाहिले असता शिवप्रताप बुरुज व घनदाट जावळीचे जंगल पाहावयास मिळते. बालेकिल्ल्याकडे जाताना मारुतीचे मंदिर लागते.या मार्गात ठिकठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल लागतात बालेकिल्ल्याचा दरवाजा भक्कम आणि सुस्थितीत आहे.येथे आल्यावर डाव्या हाताला केदारेश्वरलिंग व सदर पहावयास मिळते.याच ठिकाणी एक चोर दरवाजाही पाहायला मिळतो एक माणूस जाईल एवढी छोटी वाट…!!! खरोखर अद्भुत विचार करण्याची क्षमता होती आपल्या राजांची…!!
तटबंदी वरून पुढे आल्यानंतर कडेलोट पॉईंट दिसतो.त्यानंतर उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.याच ठिकाणी पूर्वी महाराजांचा राजवाडा होता.या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन ३० नोव्हेंबर १९५७ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते.
माझ्या मायभूमीचे रक्षण करणे हेच माझे परम कर्तव्य होय या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो कधीही यशस्वी होणार नाही हे राजांचे उदगार.!!!
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तुत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगतजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकते हे गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरचे उद्-गार…!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथर्यावर वरील उदगार कोरलेले दिसतात..!!
पुन्हा एकदा या ठिकाणी जयघोष झाला आणि आम्ही परतीच्या मार्गाने गडाखाली आलो. रात्रीचे सात वाजले होते आता आम्हाला तापोला या ठिकाणी पोहोचायचे होते पुन्हा एकदा बस सुरू झाली. बस मध्ये कोणी विनोद कोणी गोष्टी सांगितल्या गाणी म्हटलं…!! आम्ही तापोला या ठिकाणी कधी पोहोचलो हे समजलेच नाही..!!
एव्हाना रात्रीचे साडेनऊ वाजले होते.तापोला या छोट्याशा गावात बस थांबल्यानंतर समोरच कोयनेचे बॅकवॉटर अंधारात चमकत होते परंतु सर्व काही भाग रात्रीचा दिसत नव्हता त्यामुळे उत्सुकता वाढली होती. रात्रीचे साडेनऊ वाजले होते.अशोकशेठ ढवळे यांनी पालवी ऍग्रो टुरिझम तापाेला या हॉटेलमध्ये थांबण्याचे नियोजन केले होते.त्यामुळे सर्व व्यवस्था अतिशय छान झालेली होती. हॉटेलच्या मागील बाजूस प्रशस्त जागेत टेंट लावलेले होते दिवसभर प्रवास करून सर्व मावळे थकलेले होते.त्यामुळे पटकन आराम प्रत्येकाला हवा होता,प्रथमच टेन्ट मध्ये झोपण्याचा प्रसंग होता. सर्वांनी पटपट फ्रेश होत जेवण केले थोडा वेळ शेकोटीभोवती गाणे गप्पा गोष्टी झाल्या परंतु सर्वांनी ११ वाजण्याच्या आत झोपायचे ठरवले कारण सकाळची उत्सुकता लागलेली होती…लवकरच किल्ल्यावर निघायचे होते. सर्वजण टेन्ट मध्ये झोपी गेले. या भागात थंडी असल्याकारणाने पहाटे टेन्ट एकदम फ्रीझर सारखे झाले तरीही गरम कपडे असल्यामुळे जाणवले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापित करत असताना अनेक गड किल्ल्यांना स्वराज्यात सामील करून घेतले.यातील प्रत्येक गड किल्ल्याची खासियत वेगवेगळी आहे.काही गड किल्ले आकाराने मोठे आहेत तर काही गड किल्ले उंचीने मोठे आहेत.प्रत्येक गड किल्ल्याच्या भौगोलिक रचनेनुसार त्या किल्ल्याचे महत्त्व ठरवले जाते.जसे काही गड किल्ल्यांचा उपयोग स्वराज्याच्या कारभारासाठी केला गेला तर काही गड किल्ल्यांचा उपयोग घाटमाथ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला. तर काही गड किल्ल्यांचे उपयोग गुन्हेगारांच्या तुरुंगासाठी केला गेला.असाच एक थरारक अशी भौगोलिक रचना प्राप्त झालेला आणि निसर्गाने परिपूर्ण असणारा किल्ला म्हणजे वासोटा किल्ला. नैसर्गिक भौगोलिक रचना लाभलेला जावळीच्या जंगलातील असाच एक वनदुर्ग..!! ४ हजार ४२७ फूट उंचावर असून चारी बाजूने घनदाट जंगलाने वेढलेला आहे.या जंगलात वाघ,बिबट्या यासारख्या अनेक हिंसक प्राण्यांचे वास्तव्य आहे वास्तविक या दुर्गचा उपयोग त्याकाळी तुरुंगासाठी केला जायचा.गच्च घनदाट जंगल वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यातील वनदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १२०० मीटर आहे.कोयना वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलात आणि खोल दऱ्यांमध्ये वसलेला आहे सदाहरित घनदाट जंगलाचा विलोभनीय अनुभव घेत आम्ही या किल्ल्याची भटकंती करायला निघालोय…!
पहाटे चार वाजता मोहीम प्रमुख बबन तनपुरे यांनी सर्व मावळ्यांना जागे केले.आणि ताबडतोब पुढील सर्व विधी उरकून निघण्यासाठी सूचना केल्या.कारण ज्या बोटीतून आम्ही प्रवास करणार होतो त्या बोट मालकाने साडेसहा वाजेपर्यंत तयार राहण्यास सांगितले होते. पहाटेच्या सुमारास स्पष्ट होत जाणाऱ्या प्रकाशाने हॉटेलच्या आजूबाजूचे सौंदर्य लक्षात येत होते .समोरील कोयना बॅक वॉटर मुळे संपूर्ण धुक्यामध्ये समोरील डोंगर हरवले होते हे दृश्य पाहून वासोटागड निसर्ग सौंदर्य काय असेल याची कल्पना येत होती. कोयना धरणाचे पाणी सभोवताली लाल माती आणि हिरवेगार डोंगर निसर्ग चित्रातील दृश्या प्रमाणे समोर धुक्याचे चादर पसरलेले मनमोहक आणि रोमांचित करणारे दृश्य आम्ही सर्वजण पाहत होतो..!!आजचा दिवस किती रोमांचक होणार आहे याची प्रचिती दिवसाच्या सुरुवातीलाच झाली होती.५४ मावळे व चार बोटीसह तापोला गावातून वासोटाकडे जाणारा रोमांचक आणि थरारक प्रवास सुरू झाला. प्रत्येक क्षणाला बोटीने पाण्यात कापलेले अंतर…आणि काहीतरी एकदम भारी घडते याची शहराक जाणीव!! मनात हुरहुर,भीती,आश्चर्य,आणि आनंद या सगळ्यांचा उमाळा…. मस्त! कितीतरी क्षण जपून ठेवण्याजोगे….. चार बोटी..! कधी आमची पुढे तर कधी दुसरी बोट पुढे..!! जवळजवळ पाण्यातील बाेटीचा हा प्रवास वीस किलोमीटर..!! आमच्या बोटीमध्ये निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद सर यांच्याकडे असलेल्या निकॉन कॅमेऱ्यात या आचट निसर्गाचे क्षण सर बंदिस्त करत होते..!! आजुबाजूच्या बोटीतील मावळ्यांचे ही हर्षउल्हासित हवभाव टिपत होते..!! सर्व मावळे स्वत:च्या माेबाईल कॅमेरात हे सर्व सर्वांग सुंदर क्षण टिपत होते. त्याचबरोबर वसंत सरांकडे असलेल्या कराओके माइक वर सरांनी विविध जोश भरे गीत गायले…!सर्व वातावरण कसे मंत्रमुग्ध झाले होते .बोटीने पाणी कापताना होणारा घुंगराळ आवाज,उडणारे पक्षी आजूबाजूच्या किनाऱ्यालगत दिसणाऱ्या रंगीत बोटी सगळं कसं झकास..!!एकदम भारी..!! असा एकदम सात वाजता सुरू झालेला प्रवास साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता..! हळूहळू बाेट पुढे सरकत होती. आता आमच्याबरोबर रविवार असल्याने अनेक बोटी वासोटेच्या दिशेने येत होत्या. आम्हाला या ठिकाणी दिशा समजत नव्हती.बोट चालकाने दूरवरूनच वासोटा किल्ला असणाऱ्या दिशेकडे बोट करून दाखवले..!!आजूबाजूला सुंदर अशी झाडे विलोभनीय दृश्य डोळ्याच्या पारणे फेडित होते…! अखेर बोट एकदाची वासोट्याच्या किनाऱ्याला लागली.किनाऱ्यावर उतरताना मनात थोडीशी भीती मात्र वाटली आणि आपल्या धाडसाचं कौतुकही..!! आता मात्र हिरकणी,छोटा मावळा व ५२ मावळ्यांसह वासोटा गडाचा प्रत्येकाच्या मनातील ट्रेक प्रवास सुरू झाला.प्रत्येक पावलागणिस मनातला उत्साह वाढत होता किनाऱ्यावर उतरल्यावर जयघोष सुरू झाला..! छत्रपती शिवाजी महाराज की जय..!!! जय भवानी,जय शिवाजी..!!घोषणांनी सभोवतालचा परिसर दुमदुमून गेला. समोरचे अजस्त्र दिसणारे सह्याद्री पर्वत कडे जणू आम्हा सर्वांच्या स्वागताला उभे होते.मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि निरव शांतता यांचा अद्भुत मेळ पहावयास मिळाला.घनदाट जंगलात वसलेला दुर्गम किल्ला अशी ज्याची महती आहे तो पाहण्याचे बऱ्याच वर्षापासूनचे स्वप्न पूर्णत्वास येत होते.
सर्वप्रथम वन विभागाच्या कार्यालयात पोहोचलो सर्व सोपस्कार पाडले.तसेच या ठिकाणी आपण किती प्लॅस्टिक वर घेऊन चाललो आहोत याचीही नोंद करावी लागते. आमचे बोट चालक हेच आमचे गाईड झाले त्यांना अडीचशे रुपये सरकारी मानधनावर मंजुरी घेऊन दोन-तीन टप्प्यात सर्व मावळे चालू लागले. जंगल सफारी सुरू झाली.थोड्याच अंतरावर एक ओढा पार केल्यानंतर एकाच दगडावर कोरलेल्या गणेशजी व हनुमानजींचे दर्शन झाले. सकारात्मक ऊर्जेसाठी या मूर्ती या दगडावर कोरलेल्या असाव्यात.काही झाडे विचित्र आकाराची तर काही सरळ वर पर्यंत आकाशाला भिडलेले त्यातून पडणाऱ्या सावली प्रकाश किरणांचा खेळ अनुभवत होतो.या जंगलामध्ये विषारी किडे,रान कोंबडी,गवे,रानडुक्कर,बिबटे,पट्टेरी वाघ आहेत अशी माहिती शासकीय बोर्ड द्वारे लक्षात येत होती.जंगलातून जाताना मात्र किल्ला दिसत नव्हता.परंतु वाट अवघड असल्याने त्या वाटेने पुढे जात होतो. या गर्द झाडेतून आम्ही वाटेने चालत होतो अक्षरशः दमछाक करणारा हा ट्रेक आहे.रस्त्यावर नागेश्वर सुळक्याकडे जाणारा घनदाट जंगलातील मार्ग दिसतो परंतु तिकडे गेल्यास वासोटा किल्ला संध्याकाळपर्यंत होणार नाही म्हणून आम्ही पुढे गडाकडे चालत गेलो.सकाळी दहा वाजता सुरू केलेली चढाई आता अखेरच्या टप्प्यात होती सलग दोन तास चढाई करून किल्ल्याच्या अखेरच्या टप्प्यात आम्ही आलो होतो या ठिकाणी स्थानिक लोकांकडून लिंबूसरबत आणि ताकाची विक्री होते.परंतु प्लास्टिकची बाटली मात्र लगेच मागे द्यावी लागते इतकी दक्षता हेही लोक घेतात..! कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा कचरा संपूर्ण गड चढताना दिसला नाही.अतिशय सुंदर आणि नॅचरल ट्रेक होता.
सर्वप्रथम गडावर मुख्य दरवाजा लागतो.त्यानंतर गडावर पहिलं मंदिर लागतं हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो,किल्ल्याच्या दक्षिणेला गेल्यानंतर पाण्याच्या दोन टाके आहेत व समोरच्या बाजूला कोयना जलाशयाचा नयन रम्य देखावा..!! दक्षिणेला कोकणकडा व त्या ठिकाणी आहेत जुना वासोटा मात्र त्या जुन्या वासोटा कडे जाण्याचा मार्ग बंद आहे.पुन्हा एकदा मारुती मंदिराच्या समोर येऊन सर्व मावळ्यांनी ” छत्रपती शिवाजी महाराज की जय” म्हणत जयघोष केला आणि आसमंत दुमदुमून गेला.रविवार असल्याने गडावर खूप गर्दी होती.मंदिराच्या बाजूला जुन्या वाड्याच्या चौथर्याचे अवशेष दिसून येतात. त्यानंतर पुढे उत्तरेला येतं महादेवाचे सुस्थितीत असणार मंदिर..! व त्या अलीकडेच भग्नावस्थेत असलेलं कैद्याचं तुरुंग..! गडावरून त्या पुढे काही अंतरावर कोकणकडा लागतो येथे दोन सुळके आपल्याला दिसतात तर पलीकडे असणाऱ्या सुळक्याला नागेश्वर सुळका म्हणतात.कोकणातून येण्याचा मार्ग त्या बाजूने आहे तो सर्वात कठीण मार्ग आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरच्या लढाईत बंदी केलेल्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना या गडावर बंदी म्हणून ठेवण्यात आले होते.याप्रमाणे आम्ही आत्ता पुन्हा एकदा मुख्य दरवाजा जवळ आलो. आणि आम्हाला लगेचच गड उतार व्हायचे होते कारण महाराष्ट्र शासन वन खात्याचे काही नियम आहेत आपण पाच च्या अगोदर जर वन खात्याच्या ऑफिसपर्यंत पोहोचलो नाही तर आपले डिपॉझिट जप्त होते.आणि आपल्याला दंड होतो काही मावळे आमच्या पुढेच अगोदरच खाली उतरले होते.आम्ही सुद्धा झप झप खाली येत होतो गड उतरताना शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी पोलीस अधिकारी भेटले व सर्वांनी लवकर मार्गस्थ होण्याची विनंती केली.कारण आपण जर पाचच्या पुढे गड उतरलो नाही तर संध्याकाळी या जंगलातील हिंस्र प्राणी पाणी पिण्यासाठी बाहेर पडतात त्यामुळे या ठिकाणी चा रस्ता आणखीन धोकादायक होतो.म्हणून पाच नंतर या ठिकाणी थांबण्यास सक्त मनाई आहे. अशा अविस्मरणीय दुर्ग ची शिदोरी बरोबर घेऊन आम्ही खाली येत होतो.सर्व काही आयुष्यातील गोष्टी विसरून वासोटा किल्ला जंगल तेथील स्वच्छ नितळ पाणी,विविध पक्षांचे आवाज मनात साठवत हाेताे.
तसेच रविवार असल्याने असंख्य शिवप्रेमी,दुर्गप्रेमी रस्त्यात भेटले.अगदी लहान बाळापासून ते बारामतीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने गड सर करणाऱ्या ८० वर्षाच्या आजी भेटल्या. तसेच किल्ले बनवा स्पर्धेत सर्वात मोठे किल्ले बनविणारे बेळगावचे विद्यार्थी भेटले यावर्षी या दुर्गाची पाहणी करून असाच दुर्ग ६० बाय ४० फुटाचा वासोटा किल्ला बनवणार आहेत.प्रत्येक गडावर येणारी व्यक्ती नियमांचे पालन करत होता.आणि प्लास्टिकचा कचरा कुठेही आढळत नव्हता.अतिशय स्वच्छ आणि सुंदर असे वातावरण होते कदाचित इतर गड किल्ल्यांवर सुद्धा शासनाने अशीच व्यवस्था करावी असे वाटते. खाली आल्यानंतर सर्वांनी मस्त भाेजन केले. परतीच्या प्रवासात सर्वजण थकले होते.तरीही बोटीचा पुन्हा एकदा असणारा प्रवास उत्साहित करत होता.आता पुन्हा एकदा खळाळ खळाळ आवाज करीत बोटीने पाणी कापायला सुरुवात केली..! आणि एक अविस्मरणीय धुंद अनुभव मनात साठवण राहत होता वासोटा किल्ला दूर जात होता.. आणि एक विरहतेची भावना व उचंबळून येत होती आता हे सर्व नजरेआड होणार होतं हा अविस्मरणीय अनुभव कायम आमच्या मनात घर करून राहणार होता… पुन्हा एकदा तापोला ला पोहोचलो आणि परतीचा प्रवास सुरु झाला..!!
सुपर लेखन सर
छान उपक्रम
आयुष्यातील अविस्मरणीय क्षण खूप खूप धन्यवाद सर मोहिमेमध्ये माझा सारख्या एका छोट्या मावळ्यां ला सामील केल्या बद्दल