टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील पोपट अंतू घोडे यांच्या शेळीवर बिबट्याने शनिवारी ( दिनांक १९) मध्यरात्री हल्ला केला असून यामध्ये शेळी मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे.
घोडे यांच्या घराला सात फुट उंचीचे कंपाउंड केलेले असून दरवाजा पाच फुट उंचीचा आहे. बिबट्याने कंपाऊंड वरून झेप घेत आत प्रवेश करून शेळी वर हल्ला केला. त्या आवाजाने त्यांच्या कुत्र्याने घराच्या दरवाजाला जोरात धडक मारल्याने घोडे यांच्या कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या शेळीवर हल्ला करत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने त्यांच्यासमोर गेटवरून उडी मारत धूम ठोकली.
या हल्ल्यात शेळीचा जबडा खाल्ला असून शेळीच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात बिबट्याच्या बछड्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र ही टाकळी हाजी परिसरातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. शिकार न मिळाल्यामुळे थेट मानव वस्तीतच प्रवेश करून पशुधनावर बिबट्याचे हल्ले होण्याच्या घटना मध्ये वाढ झाली आहे.
या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून वनविभागाने तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी बाबाजी घोडे, सावकार घोडे , गणेश घोडे यांनी केली आहे.