आमच्या लेकरांचा जीव जातोय… आता शांत बसणार नाही

पिंपरखेडमध्ये संतप्त ग्रामस्थांचा ज्वालामुखी फुटला

0

टाकळी हाजी | शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रविवारी (दि. २) दुपारी तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या निष्पाप मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या संतापजनक घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष उसळला असून गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शिरूर-मंचर अष्टविनायक महामार्ग, बेल्हा-जेजुरी मार्ग, रोडेवाडी फाटा आणि पंचतळे (जांबूत) चौकात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन छेडले. चारही दिशांनी रस्ते बंद झाल्याने महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या.

वनविभागाविरोधात रोष : बेस कॅम्प आणि वाहनांना आग
गेल्या पंधरवड्यातील बिबट्याच्या हल्ल्यातील ही तिसरी मनुष्यहानी असल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला. वनविभागाविरोधात संतप्त जमावाने पिंपरखेड येथील बेस कॅम्प व वाहन पेटवून दिले, तसेच कार्यालयात तोडफोड केली. काही काळ परिसरात भीषण गोंधळ निर्माण झाला.
“बिबट्यांचा बळी गेल्यावर वनविभाग फक्त पंचनामे करतो, पण ठोस कारवाई करत नाही,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला.

मोठा पोलीस फौजफाटा तैनात
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता ओळखून शिरूर, पारगाव, रांजणगाव, शिक्रापूर, घोडेगाव, मंचर, नारायणगाव आणि जुन्नर या पोलीस ठाण्यांतील सुमारे १५० पोलीस कर्मचारी, २ उपविभागीय अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक आणि ३ सहाय्यक निरीक्षक असा मोठा फौजफाटा दाखल झाला असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या आंदोलनात देवदत्त निकम, दामूआण्णा घोडे, सुरेश भोर, माऊली ढोमे, शंकर पिंगळे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
देवदत्त निकम म्हणाले, “आमच्या लेकरांचा जीव जातोय, सरकार आणि वन खातं फक्त पाहतंय… आता आम्ही शांत बसणार नाही! बिबट्यांना पकडा नाहीतर तीव्र आंदोलन सुरू राहील.”

तर टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे म्हणाले, “वनविभागाला ठोस कारवाई सांगितली की ते ‘नागपूरचे कारण’ सांगतात. त्या अधिकाऱ्यांना इथे आणा, त्यांनी प्रत्यक्ष पाहावं की मनुष्यहानी म्हणजे काय असते.”

ग्रामस्थांचा इशारा : वनमंत्री येईपर्यंत आंदोलन कायम
संतप्त जमावाने स्पष्ट इशारा दिला आहे —
“जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि वनमंत्री घटनास्थळी येऊन ठोस निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नाही.”

“वनविभाग झोपेत आहे, आता जनता जागी झाली आहे”
सध्या पिंपरखेड, जांबूत, काठापूर , चांडोह , फाकटे, वडनेर, माळवाडी, टाकळी हाजी, म्हसे , कवठे येमाई, सविंदणे, मलठण, आमदाबाद, निमगाव दुडे, रावडेवाडी व परिसरातील नागरिक भयभीत असून, बिबट्याच्या हल्ल्यांबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास हा आक्रोश आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.